पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 बडोद्यातील औद्योगिक व शेती क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक भांडवली पाठबळ पुरवण्याच्या उद्देशाने व्हाईटनॅक यांच्या मार्गदर्शनाखाली ९ जुलै १९०८ रोजी बँक ऑफ बडोदाची स्थापना करण्यात आली. बडोदा बँकेच्या स्थापनेमागची स्वतःची भूमिका आणि बँकेकडून असणाऱ्या अपेक्षा स्पष्ट करताना बँकेच्या उद्घाटन समारंभात सयाजीराव म्हणतात, “स्वतः सहकारी तत्त्वावर चालून नवीन संस्थांनाही त्याच तत्त्वाचा वस्तुपाठ या बँकेने दिला पाहिजे आणि व्यापारविषयक व्यवहाराच्या आधुनिक पद्धती लोकांना शिकविण्याचे कामही या बँकेने सतत केले पाहिजे. मुंबईमध्ये स्वदेशी भांडवलावर नुकत्याच स्थापना झालेल्या दोन बँकांनी जे संपूर्ण यश संपादन केले आहे. त्यावरून निर्विवाद सिद्ध झाले आहे की, कोणत्याही देशातील हुशार बुद्धिवंताशी हिंदी अर्थशास्त्रज्ञ टक्कर देऊ शकतात. हिंदी लोकांतील काही जाती तर फार जुन्या काळापासून विविध सराफी व्यवहारांना एक उच्च कला म्हणून ओळखत आहेत."

 बडोद्यातील सहकार विकासाचा भांडवली पाया घालण्यात 'बँक ऑफ बडोदा' ने मूलभूत भूमिका बजावली. बडोदा बँकेची स्थापना करताना दहा लाख रुपयांपैकी निम्मे पाच लाख रुपये भांडवल संस्था सभासदांच्या ठेवीतून उभे केले गेले. तर उर्वरित भांडवल सयाजीरावांनी संस्थानाकडून ठेवीच्या स्वरूपात बँकेला उपलब्ध करून दिले. संस्थानाच्या या ठेवीमुळे बँकेची कर्जपुरवठ्याची क्षमता वाढली. परिणामी

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / २४