पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बँक ऑफ बडोदा

 समाजाचा विकास जर संतुलित झाला तर सामाजिक व आर्थिक प्रश्न टोकदार होत नाहीत. समाजातील संवाद नष्ट होत नाही. टोकाचा असंतोष निर्माण होत नाही आणि विकासातील सातत्य राखता येते. यासाठी १८८४ मध्ये महाराजांनी कारखान्यांना व उद्योगांना चालना देण्यासाठी बडोदा पेढी काढून कमी व्याजाने कर्ज देण्याची योजना सुरू केली होती. पुढे बडोद्यातील उद्योगांच्या विकासासाठी संस्थानातील विविध उद्योग व सहकारी संस्थांना आर्थिक पाठबळ पुरवणे अत्यावश्यक होते. यासाठी सयाजीरावांनी १९०६ मध्ये अमेरिकन अर्थतज्ज्ञ व्हाईटनॅक यांची राज्याच्या औद्योगिक प्रगतीसंदर्भातील विषयांसाठीचे तज्ज्ञ सल्लागार म्हणून नेमणूक केली. भारतात आर्थिक सल्लागारपदी नियुक्त झालेले व्हाईटनॅक हे पहिले अमेरिकन तज्ज्ञ सल्लागार होते. या काळात जुन्या पतपेढ्या बंद झाल्यामुळे स्थानिक उद्योगांना भांडवलाची कमतरता जाणवत होती. बडोदा सरकार राज्याचे सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील बरेचसे भांडवल बँक ऑफ मुंबईमध्ये गुंतवत होते. ही बँक बडोदा संस्थानच्या अधिकार क्षेत्राबाहेर होती. या पार्श्वभूमीवर सरकारची सर्व गुंतवणूक बँक ऑफ मुंबईमध्ये गुंतवल्यामुळे होणारा तोटा टाळण्यासाठी बँक ऑफ बडोदाची स्थापना करण्याची सूचना व्हाईटनॅक यांनी केली.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / २३