पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



तयार करण्याच्या प्रक्रियेची माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञांना बोलविण्यात आले. परंतु त्यानंतर साखर निर्मितीच्या दिशेने फारसे काम झाले नाही. महाराजांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर अवघ्या चार वर्षात म्हणजेच १८८५ मध्ये बडोदा संस्थानातील गणदेवी या ठिकाणी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना संयुक्त भांडवलावर सुरू केला.

 या कारखान्याचे ५० टक्के भांडवल बडोदा संस्थानचे तर ५० टक्के भांडवल शेतकऱ्यांचे होते. परंतु प्रशासकीय आणि व्यावसायिकदृष्ट्या प्रगती झाली नसल्याने राज्याने ३ लाख रुपये किमतीने हा कारखाना खरेदी करून त्याचा विस्तारही केला. सयाजीरावांनी या गणदेवी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष सहभागाने शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करण्याचा केलेला हा प्रयत्न मात्र सहकारी साखर कारखानाच्या चळवळीच्या इतिहासात बेदखल केला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा पहिला सहकारी साखर कारखाना निघण्याच्या ७० वर्ष अगोदर सयाजीरावांनी हा कारखाना सर्वप्रथम सुरू केला होता. १९०२ मध्ये अहमदाबाद येथे औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणात सयाजीरावांनी साखर आणि कापूस या भारतीय निर्यातीच्या मुख्य वस्तू आहेत. त्यामुळेच बीटापासून साखर तयार करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून दर्जेदार बीट उत्पादनासाठी

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / १८