पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या पार्श्वभूमीवर २० मार्च १९३३ ला पुण्यातील मराठा समाजाने सयाजीरावांना दिलेल्या मानपत्राला उत्तर देताना महाराजांनी व्यक्त केलेले विचार त्यावेळच्या परिस्थितीपेक्षा आजच्या परिस्थितीलाच जास्त लागू होतात असे वाटते. कारण भारतातील सामाजिक न्यायाच्या धोरणातील असंतुलित आणि टोकाच्या भूमिकेमुळे आज जातीय संघर्ष तीव्र करण्याची संधी जातिव्यवस्थेच्या समर्थकांना नकळतपणे या धोरणाने उपलब्ध करून दिली. या भाषणात सयाजीराव म्हणतात, "कोणत्याही एकाच जातीस उत्तेजन देणे केव्हाही श्रेयस्कर होणार नाही. राष्ट्र व जात यांच्यामधील संबंध हात आणि बोटे यांच्याप्रमाणे आहे. सर्व बोटे सारखी नाहीत; परंतु सर्व बोटे एकमेकांशी सहकार्य केले व मूठ वळविली तरच हातास योग्य कार्य करता येते. परंतु ज्या जाती आहेत त्यांना उत्तेजन देणे आवश्यक आहे. मात्र या बाबतीत proportion म्हणजे प्रमाण पाहिले पाहिजे. ज्या प्रमाणात एखादी जात मागासली असेल तेवढ्याच प्रमाणात तिला उत्तेजन द्यावे. तसे करणे न्याय ठरेल.'"

महाराजा सयाजीराव : ‘जातमुक्त' एकमेव प्रशासक

 सयाजीराव हे भारतातील एकमेव 'Decaste' झालेले प्रशासक होते हे त्यांच्या वरील चिंतनातून स्पष्ट होते. कोणतीही एक जात किंवा धर्म सयाजीरावांवर दावा सांगू शकत नाही.

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / ४२