पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १० मे १९१४ रोजी शाहू महाराजांनी हुजूर हुकुमाद्वारे शेतकी शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यार्थ्याची जमीन तारण घेऊन बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सयाजीरावांनी १८८१ ला राज्यकारभार हाती घेतल्यानंतर ३ वर्षांतच १८८४ ला खासेराव जाधवांना शेतकी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन इंग्लंडला पाठवले होते. म्हणजेच शाहू महाराजांच्या ३० वर्षे अगोदर सयाजीरावांनी हा आदर्श निर्माण केला होता.

महाराजा सयाजीराव : राजर्षी शाहूंच्या आरक्षण धोरणाचे पूर्वसुरी

 शाहू महाराजांनी १९०२ ला ब्राह्मणेतरांसाठी संस्थानी नोकऱ्यांत ५०% जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. त्यामुळेच आपण त्यांना 'भारतातील आरक्षणाचे जनक' असे म्हणतो. परंतु १८८५ पासूनच सयाजीरावांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या माध्यमातून मराठा जातीतील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या शिष्यवृत्त्यांसाठी जे भक्कम आर्थिक पाठबळ उभे केले त्यातून मराठा जातीतील पदवीधरांची एक 'फौज'च तयार झाली. याच फौजेतील ३२ लोक शाहू महाराजांच्या प्रशासनात त्यांच्या आरक्षण धोरणाचा लाभ घेण्यासाठी 'पात्र' ठरू शकले हे वास्तव मात्र आपण नाकारले.

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / ४०