पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेत नाही ही बाब गंभीर आहे. आजच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आणखी एक महत्त्वाची व्यक्ती बेदखल आहे. ती म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख. डॉ. पंजाबराव देशमुखांनी घटना समितीचे सदस्य म्हणून काम करत असताना इतर मागास जातींच्या आरक्षणाचा आग्रह धरला. यामध्ये त्यांनी कुणबी, कुणबी-मराठा या जातीचा समावेश केला. त्यामुळे ओ. बी. सी. आरक्षणाचे जनक डॉ. पंजाबराव देशमुख आहेत.

 १९९० नंतर मंडल आयोगाच्या अंमलबजावणीने ओ.बी. सी. जात समूहाने भारतीय राजकारणाचा चेहरा-मोहरा बदलला. ओ.बी.सी. संघटना झपाट्याने वाढल्या. परंतु या सर्व चळवळीत पंजाबरावांचा उल्लेखसुद्धा होत नाही. यापेक्षा दुर्दैवाची बाब म्हणजे कुणबी-मराठ्यांचा समावेश ओ. बी. सी. मध्ये झाल्यामुळे मराठ्यांनी जुन्या नोंदी शोधून कुणबी किंवा कुणबी-मराठा असे जातीचे दाखले काढत देश पातळीवरील प्रशासकीय सेवा, प्रवेश परीक्षा आणि निवडणुकांसाठी या तरतुदीचा चांगला लाभ घेतला. परंतु मराठा आरक्षणाच्या आंदोलनानेसुद्धा कधीही पंजाबरावांचे नाव घेतले नाही. आपल्या इतिहासाबद्दलचे हे अज्ञान फारच घातक आहे. कारण इतिहासाच्या अज्ञानामुळे आपल्या परंपरेचे भान विकसित होत नाही. परंपरेचे भान नसेल तर भविष्य दिशाहीन होते. मराठा आरक्षणाचा संघर्ष दिशाहीन होऊ नये एवढीच अपेक्षा.

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / ३९