पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 स्थापनेपासून अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे खंबीर पाठीराखे असणाऱ्या सयाजीराव महाराजांचे १९३९ मध्ये निधन झाले. यानंतर १० वर्षांतच या संस्थेबरोबरच मराठ्यांच्या जडणघडणीत असणारे सयाजीरावांचे योगदान महाराष्ट्र विसरला. मे १९४८ मध्ये नाशिक येथे झालेल्या २८ व्या अधिवेशनापासून अधिवेशनाचे अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष यांच्या भाषणात सयाजीरावांना वगळून केवळ शाहू महाराजांचा ‘जयघोष' सुरू झाला. यामुळे मराठ्यांच्या पुढील पिढीसमोर इतिहासाची केवळ एकच बाजू आली. वेळीच सयाजीराव महाराजांना ' जोडून' घेत 'वस्तुनिष्ठ' इतिहास सांगितला गेला असता तर मराठ्यांवर नैराश्याच्या डोहात 'घुटमळण्याची' वेळ आली नसती. इतिहासाबाबतचा हा स्मृतिभ्रंशाचा रोग एवढ्या कमी काळात ज्या जातीला जडतो ती जात इतिहासातून बोधही घेऊ शकत नाही आणि प्रेरणाही घेऊ शकत नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. या स्मृतिभ्रंशाचा आजचा संदर्भ द्यायचा झाला तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे देता येईल.

 गंगारामभाऊंची डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन, १८८७ मध्ये केळूसकर गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 'मराठा- ऐक्येच्छू सभा' या नावाने स्थापन केलेली मराठ्यांसह ब्राह्मणेतरांच्या उन्नतीसाठीची संस्था यावर आपल्या इतिहासात फारच ओझरती माहिती उपलब्ध आहे. या संस्थांनी केलेले काम पायाभूत असूनसुद्धा आपला इतिहास या संस्थांची दखल

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / ३८