पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देतात. या अध्यक्षीय भाषणात खासेराव जाधव म्हणतात, “श्रीमन्महाराज शाहू छत्रपती सरकार करवीर यांनीही आपल्या राज्यात ग्रामपंचायती स्थापण्याचा विचार चालविला असून बडोद्याकडील यासंबंधाची माहिती मिळविण्याचे काम सुरू केले आहे. मला चांगल्या आधारावरून समजते. याचप्रमाणे सक्तीचे शिक्षण देण्याची सुबुद्धी त्यास होवो अशी माझी ईश्वराजवळ प्रार्थना आहे."

 शाहू महाराजांनी सयाजीरावांचे अनुकरण करावे अशी अपेक्षा या भाषणात खासेराव व्यक्त करतात. खासेरावांची ही अपेक्षा १९१८ मध्ये सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा बडोद्याचा कायदा जसाच्या तसा कोल्हापूर मध्ये लागू करून शाहू महाराजांनी पूर्ण केली. अपवाद म्हणजे काही कारणास्तव मुलींना शाहू महाराजांनी या कायद्यातून वगळले होते. तर ग्रामपंचायत कायदा मात्र शाहू महाराजांच्या कारकिर्दीत लागू होऊ शकला नाही. पुढे त्यांचे उत्तराधिकारी राजाराम महाराजांनी १९ जुलै १९२७ रोजी लागू करून खासेरावांच्या अपेक्षांची पूर्ती केली.

 याच भाषणात पुढे खासेराव जाधव म्हणतात, “श्रीमंत गायकवाड सरकारचा कित्ता श्रीमंत अलिजा बहादूर शिंदे सरकार आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज गिरवितात हे पाहून आपण हाती घेतलेल्या कामी आपल्यास यश मिळण्यास साधनांची उणीव नाही.” खासेरावांचे वरील विधान राजर्षी शाहू सयाजीरावांच्या धोरणांचा अगदी सुरुवातीपासूनच पाठलाग करत होते हे स्पष्ट करणारे आहे.

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / ३७