पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वतीने जाहीर करण्यात आलेल्या या भूमिकेनुसार परिषदेच्या अधिवेशनांना विविध जातींच्या व्यक्ती उपस्थित राहत. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेस नियमितपणे हजर राहत.

 १९१४ च्या पुणे येथील अधिवेशनास रँग्लर परांजपे, ना. वा. टिळक, न. चिं. केळकर, लक्ष्मीबाई टिळक, डॉ. भांडारकर, वि. शं. पटवर्धन उपस्थित होते. 'मराठा म्हणविण्यास सार्थ अभिमान वाटत असल्याचे' स्पष्ट करत रँग्लर परांजपेंनी परिषदेवर होणारा जातीयतेचा आरोप फेटाळला. तर अस्पृश्यता निर्मूलनासाठी अस्पृश्य मुलांना मराठ्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश देण्याचा ठराव परिषदेने या अधिवेशनात केला.

 पुढे १९६२ मध्ये अमरावती येथे बडोद्याचे फत्तेसिंहराव महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनात 'मराठा' या शब्दाची व्याप्ती निश्चित करण्यात आली. या परिषदेमध्ये "मराठा व तत्सम मराठी भाषिक समाज जो शैक्षणिक, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे याचा मराठा या शब्दात समावेश करावा" असा ठराव संमत करण्यात आला. वऱ्हाड, खानदेश, कोकण, नागपूर इ. प्रांतातील कुणब्यांचा 'मराठा' या संज्ञेत समावेश केला गेला. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या जातींना सामावून घेतल्यामुळे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे सर्वसमावेशकत्व स्पष्ट होते.

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / २८