पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आवश्यकता स्पष्ट केली. शिवाजी महाराजांआधीच्या महाराष्ट्राची स्थिती विशद करतानाच हिंदवी स्वराज्य उदयाला येण्यामागची कारणे मराठा समाजाने समजून घेणे आवश्यक असल्याचे मत सयाजीरावांनी व्यक्त केले. महाराजांचे हे मत प्रामुख्याने शिवभक्तांनी समजून घेतले तरच शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन सकारात्मक परिवर्तन घडू शकेल. अन्यथा नुसता जयघोष शेवटी निराशा पदरी टाकेल.

 ११३ वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी सयाजीरावांनी केलेले सर्वतोपरी प्रयत्न आरक्षणासाठी मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाने आजवर समजून घेतले नाहीत. सयाजीरावांचे हे प्रयत्न वेळीच समजून घेतले असते तर 'एक मराठा, लाख मराठा'चा जयघोष करत लाखोंचे मोर्चे काढण्याची नामुष्की मराठा समाजावर ओढवली नसती.

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची सर्वसमावेशकता

 स्थापनेपासूनच अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेवर जातीयतेचा आरोप करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर परिषदेच्या नावातील 'मराठा' हा शब्द विशिष्ट जातीवाचक अर्थाने न वापरता व्यापक अर्थाने वापरल्याचे परिषदेच्या स्थापनेवेळीच 'दीनबंधू'मध्ये स्पष्ट करण्यात आले. या संदर्भात दीनबंधूकार लिहितात, “परिषदेच्या वेळी मराठ्यांशिवाय इतर जातींतील मंडळी हजर राहिल्यास काही वावगे ठरणार नाही.” परिषदेच्या

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / २७