पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आग्रह धरत होते. त्यांच्या या आग्रहातून बडोद्यामध्ये किती उच्चकोटीचे बौद्धिक पर्यावरण सयाजीराव महाराजांनी निर्माण केले होते हे कळते. राज्यकर्ता जर ज्ञानमार्गी असेल तर त्याचे परिणाम किती क्रांतिकारक होतात हे स्पष्ट होते.

सयाजीरावांचे द्रष्टे मार्गदर्शन

 १९१० च्या या बडोदा अधिवेशनप्रसंगी सयाजीरावांनी केलेले भाषण म्हणजे मराठ्यांसह इतर समाजातील सर्वच घटकांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी त्यांनी आखून दिलेला रोडमॅपच आहे. परिषदेने ठराव संमत करण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या अंमलबजावणीसाठी कठोर मेहनत करतानाच आपल्या कामाचे वेळोवेळी मूल्यमापन करण्याचा सल्ला सयाजीरावांनी या अधिवेशनात दिला. अधिवेशनामध्ये केवळ ५-६ ठराव करून त्यांचा पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे मत सयाजीरावांनी याप्रसंगी व्यक्त केले. वेगवेगळ्या शहरातील सभासदांऐवजी एकाच शहरातील ४-५ सभासदांची समिती नेमल्यास परिषदांमध्ये संमत झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे अधिक सोयीचे ठरेल. शिक्षण परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या शैक्षणिक-आर्थिक अडचणी दूर करतानाच त्यांच्या शिक्षणासाठीचा परिपूर्ण अभ्यासक्रम आखण्यासंदर्भात सयाजीरावांनी केलेल्या सूचना मौल्यवान आहेत.

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / २५