पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या फंडाच्या शिष्यवृत्तीने शेकडो मराठे बडोद्यात जाऊन शिकले. यातील पश्चिम महाराष्ट्रातील काही सर्वपरिचित नावे म्हणजे, माजी मंत्री वाळव्याचे राजारामबापू पाटील, स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक बापूजी साळुंखे, शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवार इ. आहेत.

 मराठा शिक्षण परिषदेच्या पहिल्या तीन अधिवेशनांमध्ये प्रामुख्याने मराठा समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यात आली होती. स्वागताध्यक्ष संपतराव गायकवाड यांनी आपल्या भाषणात पारंपरिक भारतीय शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीवर अचूक बोट ठेवले.

 या भाषणात संपतराव गायकवाड म्हणतात, " शिक्षणाच्या बाबतीत इंग्रज सरकार व आपले संस्थानिक आपापल्यापरी नानाप्रकारचे प्रयत्न करून राहिले आहेत. तथापि माझ्या मते जी एक गोष्ट अवश्य पाहिजे, तिजकडे कोणाचे लक्ष गेलेले दिसत नाही. रिसर्च (Research) आणि इनिशिएटिव्ह ( Initiative) या विषयांकडे कोणी लक्ष दिले नाही. आपल्या लोकांत कसब आहे, पुष्कळ कल्पक कारागीर आहेत; परंतु त्यांचे कसब आणि बुद्धी वृद्धिंगत करण्यास उत्तेजन पाहिजे, ते मिळत नाही.”

संपतराव गायकवाड हे सयाजीरावांचे सख्खे लहान बंधू होते. त्यांच्या भाषणात व्यक्त झालेले चिंतन फारच क्रांतिकारक होते. कारण ज्या काळात मराठ्यांचा अक्षरओळखीसाठी संघर्ष चालू होता त्या काळात संपतराव Research आणि Initiative चा

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / २४