पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भास्करराव जाधव म्हणतात, “ दीनबंधू पत्राचा जीर्णोद्धार वासुदेवराव लिंगोजी बिर्जे यांच्या हातून झाला नसता तर आजची परिषद भरविता येणे फार कठीण गेले असते.” अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या पहिल्या धारवाड अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानावरून केलेल्या भाषणात खासेराव जाधवांनी बडोद्यात सयाजीरावांनी १९०६ मध्ये लागू केलेल्या सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण कायद्याची ऐतिहासिकता स्पष्ट केली आहे. या भाषणात खासेराव म्हणतात, "ही शोचनीय स्थिती सुधारण्यासाठी ज्ञानप्रसार हा एकच इलाज आहे. श्रीमंत सयाजीराव महाराज हे फार धोरणी राजे आहेत.... आपल्या राज्यात गावोगावी शाळा स्थापन करून त्यामध्ये प्रत्येक मुला- मुलींनी शाळेत गेले पाहिजे असा कायदा केला आहे. अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत या कायद्याचा उत्तम परिणाम नजरेस पडत आहे. हल्ली दर तीन गावास दोन शाळा या प्रमाणाने शाळा स्थापन झाल्या आहेत.”

 खासेराव जाधव यांचे विस्तृत अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर परिषदेच्या पहिल्या दिवशी निबंध वाचण्यात आले. त्यात रावसाहेब बापूराव रामचंद्र आवटे (मराठा शिक्षण परिषद - तिची आवश्यकता उद्देश आणि कार्य), भगवंतराव बळवंतराव पाळेकर (मराठी लोकांत शिक्षण प्रसार होण्याकरिता काय केले पाहिजे), रा. रा. नारायणराव शंभूराव वराडकर ( परिषदेसंबंधी दोन शब्द ), सौ. चंद्राबाई नारायणराव पवार (स्त्रीशिक्षण) इ. दहा

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / १५