पान:महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यक्तींचा समावेश होता. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी एकूण १६ ठराव पास करण्यात आले. ठरावानंतर परिषदेच्या फंडास ६६५ रुपयांची मदत जमा झाली. त्यातील पाचशे रुपयांची प्रॉमिसरी नोट रावसाहेब रामचंद्रराव धर्माजी रोकडे पाटील यांनी दिली. तर परिषदेच्या खर्चासाठी शाहू महाराजांनी १०० रु., दाजीराव विचारे २० रु., रामचंद्रराव गायकवाड १५ रु., मानाजीराव कदम १० रु. अशी आर्थिक मदत केली. अशारीतीने अखिल भारतीय मराठा शिक्षण याप्रकारे परिषदेचे दोन दिवसीय पहिले अधिवेशन यशस्वीपणे पार पडले.

दुसरे अधिवेशन - १९०८

 मराठा शिक्षण परिषदेचे काम पुढे जोमाने चालू ठेवण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी दरवर्षी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार दुसरे अधिवेशन नाशिकला घेण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु अचानक अधिवेशनापूर्वी दहा-बारा दिवस महामारीची साथ सुरू झाल्यामुळे नाशिकची नियोजित परिषद रद्द करून मुंबई येथील टाऊन हॉलमध्ये ३० डिसेंबर १९०८ रोजी घेण्यात आली. या परिषदेस सरदार नरसिंगराव घोरपडे, सरदार मूळचंदराव कदम, सरदार आप्पासाहेब गजेंद्रगडकर, शेठ तुकाराम रावजी यांच्याबरोबरच दीड हजारहून अधिक मराठा व्यक्ती हजर होत्या.

महाराजा सयाजीराव आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद / १६