पान:महाबळेश्वर.djvu/315

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २८० )

 कौपीन, हातीं माळ, कांखेस कुबडी, मस्तकीं जटाभार याप्रमाणें रामदास स्वामींची मूर्ति महाराजांपुढे उभी राहिली, व नारळ प्रसाद दिला, आणि आपण कोण ह्मणून महाराजांनीं विचारल्यावर स्वामींनीं सांगितलें कीं " आम्ही गंगातिरीं राहणार परंतु सांप्रत तुमच्याकरितां कृष्णातिरीं आलों आहोत, व तुम्हाला एवढेंच सांगणें आहे कीं, तुम्ही जें राज्यसाधन आरंभिलें आहे तेंच चालवावें, आणि धर्माचा उच्छेद झाला आहे त्याची स्थापना करून देवब्राह्मणांचे ठायीं सादर असावें." इतकें म्हणून स्वामी अदृश्य झाले व महाराज जागृत झाले. पुढें मातोश्रीची आज्ञा घेऊन महाराज निघाले ते महाबळेश्वर, वांई व माहुलीपावेतो गेले तों त्यांस स्वामींकडून पत्र आलें. त्यावरून स्वप्नाचें मजकुरास जास्त पुष्टीकरण मिळालें. तें पत्र असें:-

  निश्चयाचा महा मेरु । बहुत जनासी आधारू ।
  अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी । १ ।
  परोपकाराचिया राशी । उदंड घडती जयाशी ।
  ज्याचे गुण महत्वाशी । तुलणा कैची ॥ २ ॥