पान:महाबळेश्वर.djvu/216

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १८१ )

 विलक्षण खोलीचा व आसमंतांतील प्रदेशाचा मोठा आचंबा वाटतो. हा कठडेवजा खडपा सुमारें तीन फूट उंच असल्यामुळे पाहणाऱ्यास त्याजवर खुशाल टेंकून खाली निर्धास्तपणें पाहतां येतें. आणि फार पुढें होऊन वांकून पाहिलं तर तोल जाऊन कोसळून पडण्याची धास्ती वाटत नाहीं, या ठिकाणींं उभे राहून खालील खोऱ्यामध्यें काहीं हलका पदार्थ सोडला तर तो खालचे खोऱ्यातील तुफान वाऱ्याचे योगानें पुनः माघारा येतो, ही प्रत्यक्ष करून पाहण्याजोगी मोठी मजा आहे.

 आर्थरसीटच्या पाइंटचा दगड आणि झोंपडीची खुली जागा यांच्या मध्यावर एक जिवंत पाण्याचें डबकें आहे, त्यास वाघाचें पाणी असें ह्मणतात. त्यांतील पाणी या अरण्यांतील हिंसक श्वापदे व विषारी जनावरें पीत असल्यामुळे त्याची चव घेण्याचें धाडस करणें चांगलें नाहीं. नाइलाज झाल्यास यांतील पाणी उपसून काढून पुन्हांं नवीन आलेले पाणी पिण्यास अगदींं प्रशस्त असतेंं.