पान:महाबळेश्वर.djvu/191

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५६ )

 फार आहे. सायंकाळीं फिरते वेळीं मात्र गाडया घेतात. दिवसास उत्तमान्नसेवन किंवा मित्र मंडळीकडे मेजवान्या होत असतात. पुढे साडेचार पांच वाजेपावेतों गंजिफा, बुद्धिबळे वगैरे घरांतील खेळ चालले असतात. मग उन्हें जात चाललीं ह्मणजे बग्या, फैटणी, शिग्राम, टांगे वगैरे यांत बसून थव्यांचे थवे पुनः बाहेर फिरण्यास निघतात. व कोठे तरी सुंदर व रमणीय ठिकाणी बसून सुस्वर, मनोरम आणि वीरश्रीजनक किंवा आनंदकारक वाद्यसंगीत ऐकतात. या ठिकाणींं हजारो रुपये खर्च करून विहाराच्या जागा तयार केल्या आहेत. तेथें क्रिकेट व बाडमिंटन हे खेळ मोठया झपाटयाने चालले असतात. यांपैकीं क्रिकेट ह्मणजे काय व त्यापासून हितावह परिणाम काय होतात हें सांगणें नको. परंतु इंग्रज लोकांमध्यें हा खेळ अलीकडे किंचित् मागेंं पडत चालला आहे; व बाडमिंटनचा नाद इंग्रज लोकांस चोहीकडे अतिशय लागला आहे. क्रिकेटपेक्षां हरएक प्रकारें याजपासून फायदे फार आहेत. स्त्रियांचे कोमल जातीस तर हा खेळ फारच प्रशस्त आहे. सुमारें दहा हातांचे अंतरावर