छाया दाट नसून लांकूडही इमारतींच्या उपयोगी पडण्यासारखे मोठे होत नाहीं.
जांभूळ, शहाजिरें, हिरडा, भोमा, गेळा, रामेठा, आसना, केंजळ, ऐन, नाना, बिलवा, अंजन, फणस, आंबा वगैरे इमारतीचीं झाडे या डोंगरावर व खालीं पांच मैलाचे हद्दीत जिकडे तिकडे जंगलभर आहेत, यामुळे जातां येतां ही दृष्टीस पडतात. शहाजिरीचे लांकडाचे विशेषत: घोडयाच्या गाडीस पोल चांगले संगिन होतात. येथील जंगलांत बाभळीचें झाड नांवालासुद्धां कोठेही आढळत नाहीं. देशांवर जंगली लांकडांत ह्या जातीच्या झाडाचें लांकूड पहिले प्रतीचें मजबूत आहे. परंतु याची उणीव परमेश्वरानें या जंगलांत अंजनच्या लांकडानें भरून काढली आहे. हें अंजनचें लांकूड बाभळीच्याही लांकडास मागे टाकणारें आहे. या लांकडाचीं मुसळे फार उत्तम होतात. हें लांकूड आपटलें असतां लोखंडासारखा आवाज निघतो. पाण्यांत विहीरीचें बांधकाम करतांना धर नसला ह्मणजे हें तळांत घालून काम करतात. परंतु तें कुजण्याचे बिलकूल भय नाहीं.