पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

"रामाने पूर्वीच्या काळी वानरांना वर दिला होता की तुम्ही लाल चेहऱ्याचे लोक भारतावर राज्य कराल. तीन-चार हजार वर्षांपूर्वीचे हे वानरच त्यांच्या या जन्मात लाल चेहऱ्याचे इंग्रज बनून भारतावर राज्य करत आहेत. रामाने दिलेल्या वरामुळेच इंग्रज भारत जिंकू शकले. या वरामुळेच त्यांचा पराभव अशक्य आहे, असाही विचार लोकांमध्ये पसरला होता.

 स्वामी दयानंद देवाच्या शोधात देशाटन करत असताना लोकमानस असे हतबल झाले होते. या देशस्थितीच्या अनुभवाने दयानंदांच्या विचारात परिवर्तन झाले. स्वामी विरजानंदांसारख्या गुरूच्या पायाशी बसून त्यांनी जे काही ज्ञान मिळवले होते, त्यातून स्वत:च्या मोक्षाची आणि परमेश्वरदर्शनाची त्यांची इच्छा मागे पडली. भारतीय लोकांच्या हृदयातच ते परमेश्वर शोधू लागले. त्यांना भारतीय समाजाचे संपूर्ण परिवर्तन हवे होते. लोकांना देवासमान बनवूनच हे समाज-परिवर्तन होईल असा निश्चय त्यांनी केला.

वेदांना सन्मान देऊन त्यांना शिरोधार्य मानणे हेच उत्तर

 समर्थ रामदासानी जसे श्रीराम चरित्र हे आपल्या तत्त्वज्ञानाचा पाया बनवले, तसे स्वामी दयानंदांनी आपले तत्त्वज्ञान वेदांच्या आधारावर मांडले. परकीय अभ्यासकांच्या मते वेद हे अलिकडचे व अर्धवट रानटी लोकांनी रचलेले असे होते. स्वामी दयानंदांनी वेदांचे खरे मूल्य जाणले.

 ज्यांनी या भूमीमध्ये एक राष्ट्र घडवले अशा आपल्या थोर पूर्वजांचे सखोल आणि शक्तिसंपन्न प्राणतत्त्व म्हणजे वेद हे दयानंदांनी जाणले. दिव्य ज्ञान, दिव्य उपासना व दिव्य कर्म यांची खाण म्हणजे वेद. प्राचीन भूतकाळातील हे प्राणदायी तत्त्व आधुनिक जगामध्ये प्राणसंचार करण्यासाठी दयानंदांनी पुढे आणले. वेदांचे सर्व नकारात्मक अर्थ त्यांनी आपल्या पांडित्याने व स्फूर्तीने दूर सारले आणि संपूर्ण समाजाची रचना वेदांच्या पायावर करता येईल हे अतिशय समर्थपणे दाखवले.

 स्वामी दयानंदांनी मूर्तिपूजेला प्रखर विरोध केला. तसेच ते कोणतीही जात मानत नसत. शिक्षण आणि मालमत्तेच्या बाबतीत स्त्रियांना आणि पुरुषांना समान अधिकार आहेत असे त्यांनी सांगितले. यज्ञ, दैनंदिन उपासना व सामूहिक

महर्षी दयानंद काय म्हणाले?
पाच