पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नेहरू यांच्यापर्यंत ध्येयमार्गावरील प्रकाशदीपांची यादी प्रदीर्घ आहे. यापैकी प्रत्येकाचे आणि इतरही अनेकांचे जीवन, कार्य व विचार तपशिलात अभ्यासले पाहिजेत. या अभ्यासातूनच आपल्या देशाच्या इतिहास व संस्कृतीतील उभ्या-आडव्या प्रवाहांचे ज्ञान होऊ शकेल. या मांदियाळीतील प्रातिनिधिक चार जणांपासून वरील सर्वांच्या शिकवणुकीचा अभ्यास आणि स्वीकार करण्याचा प्रारंभ व्हावा अशी अपेक्षा आहे. प्रारंभी या चौघांची शिकवण अभ्यासण्याचे कारण ते द्रष्टे ऋषी आणि वैराग्यसंपन्न संन्यासी होते हे आहे !!!

महर्षी दयानंद सरस्वती

 स्वामी दयानंदांचा जन्म सौराष्ट्रातील टंकारा या गावात १८२४ साली झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण संस्कृत भाषेत झाले. त्यांनी यजुर्वेदाचे पूर्ण अध्ययन केले होते. त्यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी घर सोडले आणि समर्थ रामदासांप्रमाणेच देवाच्या शोधासाठी असंख्य प्रयत्न करत अनेक अडचणी सोसल्या; वेदविद्या जाणणाऱ्या प्रख्यात पंडितांच्या सान्निध्यात ते आले. त्यांच्या पायाशी बसून आपले अध्ययन पक्के केले. संपूर्ण उत्तर भारतात त्यांनी प्रवास केला व वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी आपल्या जीवितकार्याला त्यांनी सुरुवात केली.

सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय गुलामगिरी

 स्वामी दयानंदांचे काम सुरू झाले तेव्हा सारा भारत इंग्रजांनी जिंकला होता व पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव पडू लागला होता. ब्रिटिशांनी ज्यांच्याकडून भारताची सत्ता मिळवली होती त्यांचा सत्ता परत मिळवण्याचा निकराचा प्रयत्न १८५७ मध्ये फसला होता. “इंग्रजांचा पराभव कधीच होऊ शकणार नाही, त्यांची संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे, त्यांचा धर्मही हिंदू धर्मापेक्षा खूप श्रेष्ठ आहे, त्यांची प्रार्थनामंदिरेही किती भव्य असतात, त्यांच्या सामुदायिक प्रार्थना हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे, त्यांचे धर्मशास्त्र आपल्या धर्मशास्त्रापेक्षा श्रेष्ठ आहे, त्यांनी वेदांचा, उपनिषदांचा, महाकाव्यांचा अभ्यासही आपल्यापेक्षा जास्त केला आहे, त्यांचे संस्कृतचे ज्ञानही आपल्यापेक्षा जास्त आहे, त्यांनी लावलेला वेदांचा अर्थ अधिक योग्य आहे, हिंदूंनी त्यांचे पूर्णपणे अनुकरण केल्याशिवाय भारताचा पुनरुद्धार होणे शक्य नाही,' अशा गैरसमजुतींनी तत्कालीन समाजमन भरून गेलेले होते.

महर्षी दयानंद काय म्हणाले?
चार