पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारताचे राष्ट्रभक्त संत

(Jnana Prabodhini : A New Experiment in Education, Vol. II

या ग्रंथातील पृष्ठ ३२१-२२ व ३२३-२४ वरील मजकुराचा अनुवाद)

चार आधारस्तंभ

 ज्या कोणा देशभक्ताला किंवा देशभक्तांच्या संघाला मातृभूमीची सेवा करायची आहे, त्यांनी भारतातील राष्ट्रभक्त संतांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. ज्ञान प्रबोधिनी हा देशाचा कायापालट करण्याचा वसा घेतलेल्या देशभक्तांचा एक संघ आहे. म्हणून ज्ञान प्रबोधिनीने देशातील निवडक राष्ट्रभक्त संतांचे विचार व कार्य स्वतः समोर आदर्श म्हणून ठेवले आहे. समाजात मानसिक क्रांती घडविण्यासाठीचे तत्त्वज्ञान व प्रेरक शक्ती म्हणून ज्ञान प्रबोधिनीने त्यांच्या शिकवणुकीचे सार आपल्या समोर ठेवले आहे.

 भारतात राष्ट्रसंतांची जी प्रदीर्घ मालिका होऊन गेली त्यामध्ये मध्ययुगातील समर्थ रामदास, त्यानंतरच्या काळातले महर्षी दयानंद व स्वामी विवेकानंद आणि अगदी अलिकडचे श्री अरविंद हे आहेत. भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून ती समजून घेता यावी यासाठी ज्ञान प्रबोधिनीमध्ये या चौघांची शिकवण प्रातिनिधिक स्वरूपात डोळ्यांसमोर ठेवली आहे. त्यातल्या त्यात अर्वाचीन अशा या चौघांच्या जीवन व तत्त्वज्ञानाचा अर्थ अत्याधुनिक ज्ञानाच्या संदर्भात शोधून त्यातून ज्ञान प्रबोधिनीचा आजचा, उद्याचा व दीर्घकालीन कार्यक्रम ठरत असतो. एखाद्या व्यक्तीचे प्रत्यक्ष काम, त्याची तत्त्वे व त्याच्या योजना यांचे शंभर टक्के अनुकरण किंवा अनुसरण करणे बदलत्या परिस्थितीत उपयोगी असतेच असे नाही. कारण काळाच्या प्रवाहात परिस्थिती आणि तीमधील आव्हाने बदलत असतात. परंतु कामाचा पाया व ध्येय कधी बदलत नाही. तपशील मात्र बदलत असतात.

 एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज व महाराजा रणजितसिंह यांच्यापासून दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर, कबीर, गुरु नानक व विनोबा यांच्यापर्यंत; विसाव्या शतकाच्या पूर्व भागातील लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपिनचन्द्र पाल

यांच्यापासून त्याच शतकाच्या मध्य भागातील सावरकर, महात्मा गांधी, जवाहरलाल

महर्षी दयानंद काय म्हणाले?
तीन