पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नववा समुल्लास : बंध व मोक्ष विवेचन निवडीची भूमिका वेदांचे दोन भाग आहेत. एक ज्ञानकाण्ड व दुसरे क्रियाकाण्ड, दयानंदांच्या मते क्रिया दोन प्रकारच्या असतात. कर्म म्हणजे शारीरिक किंवा बाह्य क्रिया व उपासना म्हणजे मानसिक किंवा आंतरिक क्रिया. त्यामुळे वेदांतील कर्मकाण्ड व उपासनाकाण्ड हे क्रियाकाण्डामध्येच येतात. ज्ञानकाण्डाला जर 'विद्या' असे नाव दिले तर क्रियाकाण्डाला ‘अविद्या' म्हणता येईल. विद्येने कोणत्याही वस्तूचे तत्त्वतः ज्ञान होते. तर अविद्या म्हणजे त्या वस्तूचे केवळ भ्रामक म्हणजे व्यावहारिक ज्ञान होणे. __मनुष्य शारीरिक किंवा मानसिक क्रियेखेरीज क्षणभरही राहू शकत नाही. या क्रिया चांगल्या प्रकारे करायला शिकणे म्हणजे अविद्या जाणणे. केवळ कर्म व उपासनेद्वारा म्हणजे अविद्या जाणून माणूस मृत्यूवर विजय प्राप्त करू शकणार नाही. त्याचप्रमाणे जो केवळ विद्या जाणतो तो अमृतत्वाची प्राप्ती करू शकणार नाही. विद्या व अविद्या दोन्ही एकाच वेळी जाणल्याने मृत्यु व दुःख यातून पार होता येते व अमतृतत्वाची प्राप्ती होते. दु:खापासून सुटका व अमृतत्वाची प्राप्ती म्हणजेच मोक्ष. या उलट अधर्म व अज्ञान यात गुरफटून जाणे म्हणजे बंधन. मनुष्याने बंधनातून सुटण्याचा म्हणजेच मोक्ष किंवा मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महर्षी दयानंद काय म्हणाले ? ३५