पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बनवायचे आहे अशीच वैदिक काळातील समाजधुरीणांची आकांक्षा होती. 'कृण्वन्तो विश्वम् आर्यम्' यासारख्या घोषणांमधून हीच आकांक्षा व्यक्त होते. निग्रो, मंगोलिअन, कॉकेशिअन हे जसे विविध मानववंश आहेत तसा आर्य म्हणून कुठला मानव-वंश आहे अशी प्राचीन भारतीयांची तरी समजूत नव्हती. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये, विशेषतः जर्मनीमध्ये, नाझी पक्षाने ज्यू धर्मीय वगळता इतर सर्व जर्मन लोक आर्य वंशाचे आहेत असा प्रभावी अपप्रचार केला होता. वैदिक काळापासून दयानंदांपर्यन्त आर्य हा कायमच सद्गुणवाचक शब्द होता, वंशवाचक नाही. त्यामुळेच, सर्व जातींच्या स्त्री-पुरुषांना वेदपठणाचा अधिकार असल्याचे महत्त्वाचे प्रतिपादन स्वामी दयानंदांनी केले व ते आर्य समाजाचे वैशिष्ट्य ठरले. नाझी जर्मनीच्या अस्तानंतर आर्य शब्दाचा वंशवाचक गैरवापर कमी होत गेला आहे. जिथे आर्य म्हणजे सुसंस्कृत लोक राहतात तो आर्यावर्त. विकसित संस्कृती ती आर्य संस्कृती. आजच्या भाषेत बोलायचे झाले तर आर्यावर्त म्हणजे अखंड भारत. आर्य संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती. आर्य म्हणजे समाजाभिमुख, कृतिशील, राष्ट्रीय वृत्तीचा आदर्श भारतीय नागरिक. या आदर्शापर्यंत जाण्याचा प्रयत्न सर्वांनीच केला पाहिजे. स्वामी दयानंद जिला आर्य संस्कृती म्हणतात, तिलाच स्वामी विवेकानंद हिंदू संस्कृती म्हणतात, तिलाच योगी अरविंद Foundations of Indian Culture या निबंधसंग्रहात Indian Culture म्हणतात आणि तिलाच साने गुरुजी भारतीय संस्कृती म्हणतात. भौगोलिक व ऐतिहासिक संदर्भ बाजूला केल्यावर या भारतीय संस्कृतीची पायाभूत तत्त्वेच मानवी विश्वसंस्कृतीची पायाभूत तत्त्वे बनू शकतात. आळस, प्रमाद व आपसातील यादवी यांच्यामुळे आर्यावर्तातच आर्यांचे स्वतंत्र राज्य राहिले नाही असे स्वामी दयानंद म्हणतात. तेव्हा त्याचा अर्थ आर्य बनणे हा आदर्श मानणारे लोक आज त्या आदर्शाप्रमाणे जगत नाहीत असाच घेतला पाहिजे. वैदिक काळात आर्यत्वाचा आदर्श मानणाऱ्यांची संख्या जास्त होती. सर्वजण त्या आदर्शाप्रमाणे तेव्हाही जगू शकत होते असे नाही. आज आर्यत्वाचा आदर्श मानणाऱ्यांची संख्या कमी असेल. परस्पर-सहकार्यानेआर्यत्वाच्या आदर्शाप्रमाणे जगू इच्छिणाऱ्यांसाठीच महर्षी दयानंदांनी आर्य समाजाची स्थापना केली. महर्षी दयानंद काय म्हणाले ?