पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आठवा समुल्लास : सृष्टीची उत्पत्ती निवडीची भूमिका सृष्टी कोणी निर्माण केली की सृष्टी अनादी आहे, हा तत्त्वज्ञानातील मोठा प्रश्न आहे. तसेच या सृष्टीचा प्रलय होणार आहे की सृष्टी अनंत आहे हाही एक अनुत्तरित प्रश्न आहे. आपण सृष्टीचाच भाग असल्यामुळे बुद्धीच्या आधाराने सृष्टीच्या आदीअंताबद्दल बोलणे अशक्य आहे. दिवस आणि रात्र एकापाठोपाठ एक येत असतात परंतु पहिला दिवस कोणता व शेवटची रात्र कोणती हे सांगणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे सृष्टी आणि प्रलय हे एका पाठोपाठ एक होत राहतात. परंतु पहिल्यांदा सृष्टी कधी झाली व शेवटचा प्रलय कधी होणार आहे हे सांगणे अशक्य आहे, असे स्वामी दयानंद वेदांच्या आधाराने श्रद्धापूर्वक सांगतात. सृष्टीचा प्रारंभ कधी झाला ? पृथ्वीवर मनुष्य प्रथम कुठे आणि कधी निर्माण झाला ? भारतामध्ये आर्य कधीपासून राहू लागले ? या सगळ्यांचीच उत्तरे देणे अवघड आहे. परंतु पुन्हा वेदांच्या आधारे इक्ष्वाकु या राजाने भारताला आर्यावर्त बनवले. म्हणजे भारतात संस्कृती प्रस्थापित केली. आर्यावर्ताची सद्यःस्थिती आर्यांमधील आळस व परस्पर द्वेष या दोषांमुळे तयार झाली आहे, असे दयानंदांचे म्हणणे आहे. परकीय सत्ता जाऊन स्वराज्य यायचे असेल तर राष्ट्रीय एकात्मता निर्माण झाली पाहिजे आणि त्यासाठी वेदादी शास्त्रांमध्ये सांगितलेले विधिनिषेध स्वीकारून त्याप्रमाणे वागायला सुरुवात केली पाहिजे असे दयानंदांचे म्हणणे आहे. या आठव्या समुल्लासातील वेच्यांमध्ये आणि पुढे दहाव्या समुल्लासातील वेच्यांमध्येही आर्य, आर्यावर्त, आर्य संस्कृती असे शब्द आले आहेत. भारतात राहणाऱ्या लोकांपैकीच जे चारित्र्यवान, नीतिमान, सुसंस्कारित आहेत ते आर्य अशी वैदिक काळातील व्याख्या आहे. भारतातील ज्या लोकांना त्यांच्या भौगोलिक, आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे अजून चारित्र्यवान, नीतिमान, सुसंस्कारित जीवन जगता येत नाही त्यांना आर्य बनवायचे आहे. तसेच साऱ्या जगातील लोकांनाही आर्य महर्षी दयानंद काय म्हणाले ?