पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ईश्वराची प्रार्थना ___ जी व्यक्ती ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत असेल तिने त्याप्रमाणे आपले आचरण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती सर्वोत्तम बुद्धी मिळावी म्हणून परमेश्वराची प्रार्थना करीत असेल तर तिने आपणाकडून होईल तितका विद्याव्यासंग केला पाहिजे. म्हणजे असे की, आपल्या पुरुषार्थाची पराकाष्ठा केल्यानंतरच परमेश्वराची प्रार्थना करणे उचित होईल. ___ अशी प्रार्थना कधीही करता कामा नये की, “हे परमेश्वरा ! तू माझ्या शत्रूचा नाश कर. मला सर्वांत मोठा बनव. माझीच प्रतिष्ठा वाढव आणि माझ्या आधीन सर्व राहतील असे कर.' अशी प्रार्थना परमेश्वर कधीही स्वीकारत नाही. कारण जेव्हा दोन शत्रू एकमेकांच्या नाशासाठी ईश्वराची प्रार्थना करत असतील तेव्हा परमेश्वराने दोघांची प्रार्थना मान्य करून दोघांचा नाश करावा काय ? कोणी असे म्हणेल की ज्याची भक्ती अधिक असेल त्याची प्रार्थना ईश्वराने ऐकावी. यावर आमचे म्हणणे असे की ज्याची भक्ती कमी असेल त्याच्या शत्रूचाही कमी नाश व्हावा. अशा मूर्खपणाच्या प्रार्थना करता करता एखादा माणूस अशीही प्रार्थना करेल की, “हे परमेश्वरा ! तू आम्हाला भाकरी भाजून घाल. माझे घर झाडून काढ. माझे कपडे धू आणि माझी शेतीवाडीही कसून दे.” अशा प्रकारे जे लोक देवावर हवाला ठेवून आळसाने बसून राहतात ते महामूर्ख असतात. कारण माणसाने पुरुषार्थ करावा हीच तर परमेश्वराची आज्ञा आहे. ती आज्ञा जो मोडील त्याला कधीच सुख मिळणार नाही. (पान १८४ - १८५) ईश्वराची उपासना समाधीच्या योगाने ज्या पुरुषाचे अविद्यादी मळ नष्ट झाले आहेत, ज्याने आत्मस्थ होऊन परमात्म्यामध्ये आपले चित्त केंद्रित केले आहे त्याला परमात्म्याशी मीलनाचे जे सुख प्राप्त होते त्याचे वर्णन वाणीने करता येत नाही. कारण जीवात्मा आपल्या अंत:करणाने त्या आनंदाचे ग्रहण करतो. उपासना या शब्दाचा अर्थ जवळ बसणे असा आहे. अष्टांग योगाद्वारे परमात्म्याचे सान्निध्य प्राप्त करणे आणि त्याला सर्वव्यापी, सर्वान्तर्यामी या रूपात प्रत्यक्ष पाहणे, यासाठी जे करावे लागते त्याला उपासना असे म्हणतात. (पान १८५) महर्षी दयानंद काय म्हणाले ?