पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परमेश्वराचा साक्षात्कार प्रश्न : परमेश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना केली पाहिजे की नाही ? उत्तर : केली पाहिजे. प्रश्न : स्तुती वगैरे केल्याने ईश्वर आपला नियम सोडून स्तुती, प्रार्थना करणाऱ्याला पापमुक्त करील काय ? उत्तर : नाही. प्रश्न : तर मग स्तुती, प्रार्थना कशासाठी करायची ? उत्तर : स्तुती, प्रार्थनेचे फळ वेगळेच आहे. प्रश्न : ते कोणते ? उत्तर : स्तुतीमुळे ईश्वराविषयी प्रीती निर्माण होते. त्याच्या गुण-कर्मस्वभावाच्या चिंतनाने आपल्या गुण-कर्म-स्वभावात सुधारणा होऊ शकते. प्रार्थनेने निरभिमानता निर्माण होऊन उत्साह वाढतो व साहाय्य मिळते. उपासनेने परब्रह्माशी मेळ होऊन त्याचा साक्षात्कार घडतो. (पान १८१) ईश्वराची स्तुती तो परमात्मा सर्वत्र व्यापक, शीघ्रकारी व बलवान आहे. तो शुद्ध, सर्वज्ञ, सर्वांचा अंतर्यामी, सर्वांवर विराजमान, सनातन, स्वयंसिद्ध आहे. परमेश्वर अनादी काळापासून आपल्या अनादी सनातन जीवरूपी प्रजेला आपल्या सनातन विद्येने यथावत् अर्थांचा बोध वेदाद्वारे करीत आहे. ही सगुण स्तुती झाली. परमेश्वरामध्ये जे-जे गुण आहेत त्या गुणांचे वर्णन म्हणजे सगुण स्तुती होय. __ तो परमेश्वर कधी शरीर धारण करत नाही, अथवा जन्म घेत नाही. त्याच्यामध्ये छिद्र अथवा व्रण असत नाही, तो नाडीशिरास्नायूच्या बंधनात अडकत नाही, तो कधी पापाचरण करत नाही, त्याला क्लेश, दु:ख, अज्ञान कधीही होत नाहीत, रागद्वेषादी विकारांपासून तो अलिप्त असतो, अशा प्रकारे परमेश्वराची जी स्तुती केली जाते ती निर्गुण स्तुती होय. परमेश्वरामध्ये जे गुण आहेत तसे गुण-कर्म-स्वभाव आपलेही बनणे हे स्तुतीचे फळ आहे. उदाहरणार्थ परमेश्वर न्यायी आहे. तसेच आपणही न्यायी बनण्याचा प्रयत्न करावा. असे न करता केवळ भाटाप्रमाणे जो परमेश्वराचे गोडवे गातो पण आपले आचरण सुधारत नाही त्याचे ते गुणसंकीर्तन व्यर्थ आहे. (पान १८२) महर्षी दयानंद काय म्हणाले ?