पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मातेची सेवा करून तिला प्रसन्न ठेवावे. तिच्याशी कधीही कठोर वर्तन करू नये व अपशब्द वापरून तिला दु:ख देऊ नये. दुसरा देव पिता आहे. त्याचीही सेवा करावी आणि त्याचा सत्कार करावा. तिसरा देव गुरू किंवा आचार्य हा आहे. तो आपल्याला विद्या देतो. तन-मनधनाने त्यांची सेवा करावी. चौथा देव अतिथी आहे. जो विद्वान, धार्मिक, निष्कपटी, सर्वांचे कल्याण इच्छिणारा, जगभर भ्रमण करणारा, सत्याच्या उपदेशाने सर्वांना सुखी करणारा अतिथी असतो, त्याची सेवा करावी. ___ पाचवा देव पत्नीसाठी पती व पतीसाठी पत्नी हा होय. स्त्रीला तिचा पती देवाप्रमाणे व पुरुषाला त्याची पत्नी देवतेप्रमाणे पूजनीय असते. हेच ते वैदिक पंचायतन होय. याच देहधारी देवांच्या संगाने मनुष्यदेहाची उत्पत्ती, पालन, सत्यशिक्षण, विद्या व सत्योपदेश यांची प्राप्ती होते. याच परमेश्वर प्राप्तीच्या पायऱ्या आहेत. या देवतांची पूजा न करता जे लोक पाषाणादिकांच्या मूर्तीची पूजा करतात ते अत्यंत वेदविरोधी आहेत. (अकरावा समुल्लास ३२३ - ३२४) शुभ गुण-कर्मे हीच तीर्थे ___ सत्य शास्त्रांचे अध्ययन-अध्यापन, धर्मनिष्ठ विद्वानांचा सत्संग, परोपकार, धर्मानुष्ठान, योगाभ्यास, निर्वैरत्व, निष्कपटत्व, सत्यभाषण, सत्य मानणे, सत्य करणे, ब्रह्मचर्य; आचार्य, अतिथी, माता व पिता यांची सेवा; परमेश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना; शांती, जितेंद्रियता, सुशीलता, धर्मयुक्त पुरुषार्थ, ज्ञान-विज्ञान,इत्यादी शुभ गुणकर्म दु:खातून तारणारे असल्यामुळे ती वेदानुसार तीर्थच आहेत. जल व स्थल यांनी युक्त असणारी ठिकाणे ही कधी तीर्थे असू शकत नाहीत. कारण ‘जना: यैः तरन्ति तानि तीर्थानि' म्हणजे ज्यांच्या योगाने माणूस दु:खातून मुक्त होतो त्यांना तीर्थ असे म्हणतात. जल-स्थलयुक्त ठिकाणे ही तारणारी नसून बुडवून मारणारी असतात. त्यापेक्षा नौका वगैरेना तीर्थ म्हणणे अधिक सयुक्तिक होय. कारण त्यांच्या साहाय्याने माणसे समुद्र वगैरे तरून जातात. (अकरावा समुल्लास ३३५ - ३३६) महर्षी दयानंद काय म्हणाले ?