पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सत्यार्थप्रकाशातील वेचे परमेश्वर कोणता ? जो सर्व दिव्य गुणकर्मस्वभाव व विद्या यांनी युक्त आहे, ज्याच्यामध्ये पृथ्वी, सूर्य आदी लोक स्थित आहेत, जो आकाशाप्रमाणे सर्वत्र व्याप्त आहे व जो सर्व देवांचा देव आहे त्या परमेश्वराला जे लोक जाणत नाहीत, मानत नाहीत व त्याचे ध्यानही करत नाहीत ते नास्तिक व निर्बुद्ध लोक सदैव दु:खसागरात बुडालेले राहतात. मात्र जे लोक त्याचीच जाणीव बाळगतात ते सर्व सुखी होतात. (पान १७६) देव कोणते ? जे लोक देव किंवा देवता या शब्दाचा अर्थ परमेश्वर असा करतात त्यांची ती चूक आहे. परमेश्वर हा देवांचा देव असल्याने त्याला महादेव म्हणतात. तोच साऱ्या जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारा, न्यायाधीश व अधिष्ठाता म्हणजे सर्वांचा आधार आहे. शतपथ ब्राह्मणात अशी व्याख्या करण्यात आली आहे की तेहतीस देव आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, चंद्रमा, सूर्य व नक्षत्रे ही आठ सर्व सृष्टीची निवासस्थाने असल्याने ते आठ वसू आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पाच प्राण. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे पाच उपप्राण* आणि अकरावा जीवात्मा हे शरीराला सोडून जाताना रुदन करायला लावतात म्हणून या अकरांना रुद्र असे म्हणतात. संवत्सराच्या बारा महिन्यांना बारा आदित्य म्हणतात. कारण ते सर्वांचे आयुष्य घेऊन जाणारे असतात. ऊर्जेचे एक रूप असलेल्या विजेचे एक नाव इंद्र आहे. कारण ऊर्जा ऐश्वर्यदायक असते. यज्ञ म्हणजेच प्रजापती. कारण हवनाच्या योगाने वायू, वृष्टी, जल व औषधी वनस्पती यांची शुद्धी होते व प्रजेचे पालन होते. विद्वानांचा सत्कार व नाना प्रकारची शिल्पविद्या (कारागिरी) यांचाही समावेश यज्ञामध्ये होतो. यज्ञामुळे प्रजेचे पालन होते.

  • उपप्राणांचे काम अवयवांच्या रक्षणाचे असते. त्यांमुळे होणाऱ्या क्रिया पुढीलप्रमाणे आहेत : नाग - ढेकर देणे, कूर्म - पापण्यांची उघड झाप, कृकल - शिंकणे, देवदत्त - जांभई देणे, धनंजय - मृत्यूनंतर काही काळ शरीराचे कुजणे थांबवणे

महर्षी दयानंद काय म्हणाले ?