पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सहावा समुल्लास : राजधर्म निवडीची भूमिका दयानंदांनी राजे व राजपुरुषांसाठी या समुल्लासामध्ये जे काही सांगितले आहे ते आजच्या काळात लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना लागू होऊ शकते. दयानंदांनी मुख्यतः शासनाची कर्तव्ये व शासनव्यवस्था यासंबंधीचे विचार या समुल्लासात मांडले आहेत. धर्मविचार मांडणाऱ्या ग्रंथात हा विषय आल्यावर आश्चर्य वाटू शकते, कारण आज धर्माची व्याख्या उपासनापंथ किंवा संप्रदाय इतकी संकुचित झाली आहे. परंतु धर्माची पारंपरिक भारतीय व्याख्या 'अभ्युदय आणि निःश्रेयस साधून व्यक्तिगत जीवन आणि समाज जीवन संतुलित करून जो समाजाला स्थैर्य देतो व व्यक्तीला पूर्णत्वाची प्रेरणा देतो तो धर्म' अशी आहे. हल्ली ज्याला विकास म्हणतात तो मुख्यतः भौतिक विकास असतो. भौतिक विकासाला नैतिक विकासाची जोड दिली म्हणजेच व्यक्तिगत चारित्र्य व सामाजिक चारित्र्य यांची जोड दिली की अभ्युदय होतो. समाजाच्या भौतिक आणि नैतिक विकासाशिवाय व्यक्तीचा विकास अपुरा राहतो. समाजाचा अभ्युदय झाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाबरोबर आत्मिक विकासाची ओढ लागते. त्यातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला पूर्णत्व येते म्हणजे त्याला निःश्रेयस प्राप्त होते. सध्याची भाषा विकसित आणि विकसनशील समाजांची आहे. भारतीय विचारानुसार एखादा समाज अभ्युदित आहे की अभ्युदयशील आहे हे पाहिले पाहिजे. अभ्युदित समाजात शासनव्यवस्था, शासक, कायदा आणि न्यायव्यवस्था यांची गरजच नसते असा आदर्श सांगितला आहे. हा आदर्श भारतात किंवा जगातील कोणत्याही विकसित देशात दिसत नाही. अभ्युदयशील समाजामध्ये मात्र शासनव्यवस्था, शासन, कायदा व न्यायव्यवस्था या सगळ्यांची गरज असते. कारण व्यक्तिगत व सामाजिक चारित्र्य पूर्ण घडलेले नसताना स्वार्थी आणि आत्मकेंद्रित लोक इतरांवर अन्याय करू शकतात आणि त्यांचे शोषणही करू शकतात. महर्षी दयानंद काय म्हणाले ?