पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्माची दहा लक्षणे १) नेहमी धैर्य बाळगणे. २) निंदा-स्तुती, मानापमान, हानी-लाभ इत्यादी दु:खांमध्ये सहनशील राहणे. ३) मनाला सदैव धर्माचरणासाठी प्रवृत्त करणे आणि अधर्मापासून परावृत्त करणे, अधर्माचरणाची इच्छाच मनात निर्माण होऊ नये असा प्रयत्न करणे. ४) चोरी न करणे. मालकाच्या परवानगीशिवाय लबाडीने, फसवून, विश्वासघाताने वाईट कृत्ये करून, वेदविरुद्ध उपदेश करून दुसऱ्यांच्या वस्तूंचा अपहार करणे ही चोरी होय. चोरी न करणे हेच अस्तेय होय. ५) राग, द्वेष व पक्षपात सोडून अंत:शुद्धी करणे आणि पाणी, माती, मार्जन इत्यादींद्वारे बाह्य पावित्र्य साध्य करणे. ६) इंद्रियांना अधर्माचरणापासून परावृत्त करून त्यांना धर्माच्या मार्गाने चालविणे. ७) मादक द्रव्ये, इतर बुद्धिनाशक पदार्थ, दुष्टांची संगत, आळस, प्रमाद, आदी दोषांचा त्याग करून, श्रेष्ठ पदार्थांचे सेवन व सज्जनांची संगती, योगाभ्यास, धर्माचरण, ब्रह्मचर्य आदी शुभ कर्मांनी बुद्धीचे सामर्थ्य वृद्धिंगत करणे. ८) पृथ्वीपासून परमेश्वरापर्यंत असणाऱ्या सर्व पदार्थांचे यथार्थ ज्ञान मिळविणे आणि त्यापासून आपले यथायोग्य कल्याण करून घेणे. सत्य जसे आत्म्यात असेल तसे ते मनात आणणे, जसे सत्य मनात असेल तसेच आचरणात आणणे, ही विद्या होय. याहून जी विपरीत ती अविद्या होय. ९) जो पदार्थ जसा असेल त्याला तसाच समजणे, तसेच बोलणे व तसेच करणे म्हणजे सत्य होय. १०) क्रोधादी दोषांचा त्याग करून शांतता वगैरे गुणांचे ग्रहण करणे. ही धर्माची दहा लक्षणे आहेत. या दशलक्षणयुक्त, पक्षपातरहित, न्यायाचरण युक्त धर्माचे आचरण चारही आश्रमांतील लोकांनी करावे. या वेदोक्त धर्मानुसार स्वत: आचरण करणे आणि इतरांना समजावून सांगून आचरण करण्यास प्रवृत्त करणे हा संन्याशांचा विशेष धर्म आहे. (पान १२५-१२६) संन्यासग्रहणाची आवश्यकता ___ ज्याप्रमाणे शरीरामध्ये मस्तकाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आश्रमांमध्ये संन्यासाश्रमाची आवश्यकता असते. कारण त्या आश्रमावाचून विद्या व धर्म यांची वाढ होऊ शकत नाही. इतर आश्रमांमध्ये विद्याग्रहण, गृहकृत्ये, तपश्चर्या आदी त्या त्या आश्रमातील कर्तव्ये करावी लागत असल्यामुळे सवड फार कमी मिळते. नि:पक्षपाती महर्षी दयानंद काय म्हणाले ?