पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गाई, घोडे, हत्ती वगैरे जाती आहेत. वृक्षांमध्ये पिंपळ, वड, आंबा वगैरे जाती आहेत. पक्ष्यांमध्ये हंस,कावळा, बगळा वगैरे जाती आहेत. जलचरांमध्ये मासे, मगरी वगैरे जातिभेद आहेत. माणसांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र , अंत्यज हे जातिभेद ईश्वरकृत नाहीत. वर्णाश्रमव्यवस्थेच्या संदर्भात आम्ही या पूर्वी सांगितल्याप्रमाणे गुण-कर्म-स्वभावानुसार वर्ण व्यवस्था मानणे आवश्यक आहे. ती जन्मानुसार समजणे चूक आहे. म्हणून ती मनुष्यकृत आहे असे म्हणावे लागते. माणसाच्या गुणकर्मस्वभावानुसार त्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आदी वर्णांची परीक्षा घेऊन त्या-त्या वर्णात टाकणे हे राजाचे व विद्वानांचे काम आहे. (अकरावा समुल्लास, पान ३९३) आधी वर्णनिश्चिती मग स्वयंवर शूद्र कुळात जन्मास येऊनही ज्याच्या अंगी ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांच्यासारखे गुण, कर्म व स्वभाव असतील तर तो शूद्र ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य बनतो. याचप्रमाणे ज्याचा जन्म ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य कुळात झाला असेल व त्याचे गुण, कर्म, स्वभाव हे शूद्रासारखे असतील तर तो शूद्र बनतो. याचप्रमाणे क्षत्रिय अथवा वैश्य कुळात जन्मलेल्या व्यक्तीचे गुण, कर्म व स्वभाव ब्राह्मण अथवा शूद्र यांच्यासारखे असतील तर ती व्यक्ती ब्राह्मण किंवा शूद्र बनते. याचा अर्थ असा की चार वर्णांपैकी ज्या-ज्या वर्णाचे गुण, कर्म व स्वभाव स्त्री-पुरुषांमध्ये असतील. त्या त्या वर्णाची ती स्त्री किंवा तो पुरुष असे समजावे. (पान ८२) गृहस्थाश्रमातील पंचमहायज्ञ बुद्धी, धन व हित यांची वृद्धी करणारी जी शास्त्रे व वेद आहेत त्यांचे नित्य श्रवण व श्रावण (म्हणजे ऐकवणे किंवा प्रवचन करणे) करावे. ब्रह्मचर्याश्रमात ज्यांचे अध्ययन केले असेल ते ग्रंथ स्त्री-पुरुषांनी नित्य वाचावेत व त्यांचे चिंतन करावे. कारण मनुष्य जसजसा शास्त्रांमध्ये पारंगत होत जातो तसतसे त्या विद्येविषयीचे त्याचे विशेष ज्ञान वाढत जाते व अध्ययनात त्याची रुची वाढत जाते. पहिल्या ब्रह्मयज्ञामध्ये वेदादि शास्त्रांचे अध्ययन-अध्यापन करणे, संध्योपासना व योगाभ्यास करणे यांचा समावेश होतो. १४ महर्षी दयानंद काय म्हणाले ?