पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चवथा समुल्लास : समावर्तन संस्कार आणि गृहस्थाश्रम निवडीची भूमिका शिक्षण संपल्यानंतर ब्रह्मचर्याश्रमाची सांगता करून विद्यार्थ्यांनी गृहस्थाश्रमात प्रवेश करावा असे स्वामी दयानंद म्हणतात. १८७५ साली दयानंदांनी म्हटले आहे की विवाह स्वयंवर पद्धतीने व्हावेत. विवाहामध्ये मुख्य संबंध वधु-वरांचा असतो, त्यांच्या आईबाबांचा नाही. त्यामुळे विवाहाचा निर्णय मुलाने व मुलीनेच घ्यावा हे चांगले. जोपर्यंत ब्रह्मचर्य पालन करून अध्ययन पूर्ण केल्यावरच स्वयंवर पद्धतीने विवाह होत असत तोपर्यंत आपल्या देशाची सतत उन्नती होत होती असेही दयानंद म्हणतात. बालविवाह सुरू झाल्यापासून देशाची अवनती होऊ लागली. कारण ब्रह्मचर्याश्रमाकडे दुर्लक्ष होऊ लागले व विद्याभ्यास थांबला असेही दयानंद म्हणतात. दयानंद स्वयंवर पद्धतीचा पुरस्कार करत असले तरी मुलामुलींनी आपल्या वर्णातीलच जोडीदार निवडावा असेही ते सांगतात. परंतु प्रत्येकाचा वर्ण निश्चित करण्याचे काम शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्याची परीक्षा घेऊन करायची जबाबदारी राजाची व विद्वानांची आहे असे दयानंदांचे म्हणणे आहे. वर्ण मनुष्यकृत आहेत;, ईश्वरकृत नाहीत असे त्यांचे स्पष्ट मत आहे. आज एकविसाव्या शतकात स्वधर्माप्रमाणे स्व-वर्ण ही प्रत्येकाने स्वतःचा ठरवावा असे म्हटले पाहिजे असे वाटते. गृहस्थाश्रमामध्ये आयुष्यभर पंचमहायज्ञ करणे हे मुख्य कौटुंबिक कर्तव्य आहे, असे दयानंदांनी सांगितले आहे. पहिल्या ब्रह्मयज्ञामध्ये अध्ययन, अध्यापन, उपासना व योगाभ्यास यांचा समावेश त्यांनी केला आहे. देवयज्ञामध्ये अग्निहोत्र आणि विद्वानांचा सत्संग, पितृयज्ञामध्ये ऋषी, विद्वान, माता, पिता आणि योगी यांची सेवा सांगितली आहे. भूतयज्ञ आणि अतिथीसेवा यांचा पारंपरिक अर्थच त्यांनी दिला आहे. (१२ महर्षी दयानंद काय म्हणाले ?