पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चारही वर्णांस शिक्षणाची आवश्यकता फक्त ब्राह्मणांनीच विद्याभ्यास केला आणि क्षत्रिय, वैश्य, शूद्र या मंडळींनी तो केला नाही तर विद्या, धर्म, राज्य व धन यांची वृद्धी कधीही होऊ शकत नाही. कारण ब्राह्मण केवळ अध्ययन-अध्यापन करून व इतर वर्णीयांकडून उपजीविकेचे साधन मिळवून जगू शकतात. पोटापाण्याच्या साधनाच्या ताब्यात असल्याने आणि इतर वर्णीयांना आज्ञा देण्याचे व यथावत् परीक्षा करून त्यांना शिक्षा देण्याचे सामर्थ्य नसल्याने सर्व वर्ण पाखंडी बनतात; आणि जेव्हा क्षत्रिय, वैश्य व शूद्र विद्वान् बनतात तेव्हा ब्राह्मणही अधिक विद्याभ्यास करतात व धर्माच्या मार्गाने चालतात. शिवाय त्या क्षत्रिय, वैश्य व शूद्रांसमोर ते पाखंडही करू शकत नाहीत. जेव्हा क्षत्रिय, वैश्य व शूद्र अडाणी असतात तेव्हा ब्राह्मण आपल्या मनाप्रमाणे वागतात व इतरांना वाटेल ते करायला लावतात. म्हणून आपले कल्याण व्हावे असे ब्राह्मणांना वाटत असेल तर त्यांनी क्षत्रिय, वैश्य व शूद्रांना वेदादि सत्यशास्त्रांचा अभ्यास करावयास लावण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. कारण क्षत्रिय, वैश्य व शूद्र लोकच विद्या, धर्म, राज्य आणि लक्ष्मी यांची वृद्धी करणारे असतात. ते कधी भिक्षादेही करीत नाहीत. त्यामुळे ते विद्याव्यवहाराच्या बाबतीत पक्षपातीही होऊ शकत नाहीत. जेव्हा सर्व वर्णांमध्ये विद्येचा व सुशिक्षणाचा प्रचार झालेला असतो तेव्हा कोणालाही पाखंडी, अधर्मयुक्त मिथ्या व्यवहार चालविणे शक्य नसते. यावरून असे सिद्ध होते की क्षत्रिय, वैश्य व शूद्रांना नियमानुसार चालविणारे ब्राह्मण व संन्यासी असतात तर ब्राह्मण व संन्यासी यांना सुनियमानुसार चालविण्याचे काम क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांनी करावयाचे असते. म्हणून सर्व वर्णांच्या स्त्री-पुरुषांमध्ये विद्या व धर्म यांचा प्रचार अवश्य झाला पाहिजे. (पान ४९-५०) महर्षी दयानंद काय म्हणाले ?