पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तिसरा समुल्लास : अध्ययन व अध्यापन निवडीची भूमिका सत्यार्थप्रकाशाचा तिसरा समुल्लास समाजाने शिक्षणाची व्याख्या कशी करावी यासंबंधीचा आहे. शिक्षक व नातेवाईक यांनी मुलांना पहिली गोष्ट ही शिकवली पाहिजे की दागिने घालून केवळ देहाभिमान आणि आसक्ती वाढते. उत्तम विद्या, शिक्षण, गुण, कर्म आणि स्वभाव हेच खरे दागिने आहेत, हे मुलांना शिकवले पाहिजे. सत्याचा उपदेश आणि विद्यादान यांच्याद्वारे इतरांची दुःखे दूर करण्यातच धन्यता आहे. हे शिकवण्यासाठी मुले आठ वर्षांची होताच त्यांना शाळेत घालावे असे दयानंद म्हणतात. उत्तम आचरण शिकणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे आणि उपजीविकेसाठी शिक्षण हा शिक्षणाचा उपउद्देश आहे हा प्राधान्यक्रम दयानंदांच्या मनात स्पष्ट आहे. महर्षी दयानंद वेदप्रणीत धर्माचा पुरस्कार करणारे आहेत. परंतु वेदांचा अर्थ ते तपश्चर्येने आणि योगाभ्यासाने शुद्ध झालेल्या स्वयंप्रज्ञेने व ऋषि-परंपरेनुसार लावतात. त्यामुळे तत्कालीन रूढीच्या पूर्णपणे विरुद्ध असा वेदांचा सत्यार्थ ते सांगतात. ते चातुर्वर्ण्य मानतात, परंतु चारही वर्णांच्या लोकांना शिक्षणाची आवश्यकता आहे असेही सांगतात. फक्त ब्राह्मणांनी विद्याभ्यास केला व इतर वर्णांनी केला नाही तर देशातील विद्या, धर्म, राज्य आणि धन यांची वाढ होणार नाही असे दयानंद स्पष्टपणे सांगतात. यापेक्षाही अधिक स्पष्ट विधान करताना ते म्हणतात की क्षत्रिय, वैश्य व शूद्र लोकच विद्या, धर्म, राज्य व धन यांची वृद्धी करणारे असतात. उपजीविकेची साधने चारही वर्णांची वेगवेगळी असतील परंतु त्यासाठीचे शिक्षण हे शिक्षणाचे उपउद्दिष्ट आहे. विद्या व धर्म यांचा प्रसार हेच शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. व ते चारही वर्णासाठी, सर्व वर्णांच्या स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी, आवश्यक आहे. हा दयानंदांचा विचार क्रांतिकारक आहे. दयानंदांची चातुर्वर्ण्याविषयीची भूमिका त्यांच्या काळाच्या पुढे होती हे कळावे म्हणूनच पुढील वेचे निवडले आहेत. आज त्यांच्यानंतर दीडशे वर्षांनी वर्ण असेलच तर महर्षी दयानंद काय म्हणाले ?