पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परमेश्वरासारखे होण्याचा प्रयत्न म्हणजेच नामस्मरण ___ धर्मयुक्त कामे करणे हेच मोठे यश असून तेच परमेश्वराचे नामस्मरण होय. ब्रह्म, परमेश्वर, ईश्वर, न्यायकारी, दयाळू, सर्वशक्तिमान् वगैरे नावे परमेश्वराच्या गुणकर्मस्वभावानुसार आहेत. उदाहरणार्थ, सर्वांहून मोठा म्हणून ब्रह्म; ईश्वरांचा ईश्वर म्हणून परमेश्वर; तो सामर्थ्यवान् आहे म्हणून ईश्वर; जो कधीही अन्याय करत नाही, सदैव न्यायच करतो तो न्यायकारी; सर्वांवर कृपादृष्टी ठेवतो म्हणून दयाळू; आपल्या स्वत:च्या सामर्थ्याने साऱ्या जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करतो, त्यासाठी कोणाचीही मदत घेत नाही, म्हणून सर्वशक्तिमान्; जगातील विविध पदार्थांची निर्मिती करणारा म्हणून ब्रह्मा; सर्वांमध्ये व्याप्त होऊन सर्वांचे रक्षण करतो म्हणून विष्णू; सर्व देवांचा देव म्हणून महादेव; प्रलय करतो म्हणून रुद्र; असा अर्थ व्यक्त करणारी नावे परमेश्वराची आहेत. परमेश्वराचे हे गुण स्वत:मध्ये आणण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे म्हणजे मोठी कामे करून त्याने मोठे बनावे. त्याने समाहून समर्थ बनावे, आपले सामर्थ्य सतत वाढवावे, कधीही अधर्माचरण करू नये. सर्वांवर दया करावी, आपल्या प्रगतीची साधने सर्व परिपूर्ण बनवावीत. तंत्रज्ञानाचा विकास करून नाना प्रकारची उपकरणे तयार करावीत. साऱ्या जगातील जीवांना आपल्या आत्म्याप्रमाणेच सुखदु:ख होत असते हे ओळखावे, सर्वांचे रक्षण करावे. विद्वानांमध्ये विद्वान बनावे, दुष्कृत्ये करणाऱ्या दुष्टांना शिक्षा करावी आणि सज्जनांची पाठराखणी करावी. अशा प्रकारे परमेश्वराच्या नावांचे अर्थ जाणून घेऊन परमेश्वराच्या गुणकर्मस्वभावानुसार आपले गुणकर्मस्वभाव बनविण्याची धडपड करणे हेच परमेश्वराचे नामस्मरण होय. (अकरावा समुल्लास, पान ३३६) महर्षी दयानंद काय म्हणाले ?