पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महर्षी दयानंदांचे विचार पहिला समुल्लास : ईश्वरनाम व्याख्या निवडीची भूमिका महर्षी दयानंदांनी सत्यार्थप्रकाशाची सुरुवात परमेश्वराच्या नावांपासून केली आहे. आपल्या भोवतालच्या ज्या ज्या गोष्टी आपण त्यांच्या पार्श्वभूमीपासून वेगळ्या पाहू शकतो, त्यांची ओळख पटण्यासाठी आणि लक्षात राहण्यासाठी आपण त्यांना वेगवेगळी नावे देतो. वस्तूंना आणि व्यक्तींना जशी आपण नावे देतो तशीच ठिकाणांना, कृतींना आणि भावनांनाही त्या वेगळ्या ओळखू येऊ लागल्यानंतर वेगळी नावे देतो. पाणी या एकाच पदार्थाला तो स्थिर असेल तर वेगवेगळ्या आकारानुसार डबके, तळे आणि सरोवर अशी नावे देतो. पाणी वाहते असेल तर पुन्हा त्याच्या आकारानुसार झरा, ओढा आणि नदी अशी नावे देतो. नेमकी ओळख पटण्यासाठी जेवढे बारकावे शोधता येतील तेवढे शोधून त्या प्रत्येकाला वेगळे नाव देणे ही माणसाची प्रवृत्तीच आहे. हे सगळे जग ज्या शक्तीचे दृश्य कार्यरूप आहे व ज्या शक्तीमुळे ते चालते त्या शक्तीचे वेगवेगळे आविष्कार जगभरच्या वेगवेगळ्या लोकांना लक्षात येत गेले आहेत. त्या प्रत्येक आविष्काराला लोकांनी वेगवेगळी नावे दिली आहेत. या शक्तीची अनेक रूपे आपल्या अजून लक्षात यायची आहेत. जेवढे आविष्कार किंवा रूपे आपल्याला लक्षात आली तेवढी नावे त्यांना दिली. या विश्वशक्तीलाच भारतीय संस्कृती परमेश्वर म्हणते. या परमेश्वराच्या एकेका गुणाला दिलेले एकेक नाव म्हणजे परमेश्वराचेच एकेक नाव असेही भारतीय संस्कृती मानते. महर्षी दयानंदांनी सत्यार्थप्रकाशाच्या पहिल्या समुल्लासात नमुन्यादाखल परमेश्वराची १०० नावे दिली आहेत. पुढे ते असेही म्हणतात की परमेश्वराचे गुण, कर्म आणि स्वभाव अनंत आहेत. त्यानुसार त्याची नावेही अनंत आहेत. हे सांगण्याचा त्यांचा हेतू नावावरून भांडत न बसता किंवा नावासाठी भांडत न बसता ज्याचे ते नाव आहे त्या परमेश्वराची ओळख करून घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे. महर्षी दयानंद काय म्हणाले ?