पान:महमद पैगंबर.djvu/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६१ मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास बिगर-मुसलमान मतदारसंघांत जागा राखून ठेवण्याची प्रथा पडून, मद्रासच्या बिगर-मुसलमान मतदारसंघातर्फे निवडून येणा-या ६५ प्रतिनिधींपैकी २८ ब्राह्मणेतर प्रतिनिधी या राखीव पद्धतीने यावे असे ठरलें ! मुंबई इलाख्यांत ४६ बिगर-मुसलमान जागांपैकी ७ जागा मराठ्यांच्या राखीव ठरल्या ! अस्पृश्यांच्या प्रतिनिधींची नेमणूक गव्हर्नरांनी करावी असे ठरले. कामगारांच्या प्रतिनिधींना हाच न्याय लागू करण्यांत आला. हिंदी ख्रिस्ती, अँग्लो इंडियन व युरोपियन यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याची सूचना माँटफर्ड-अहवालांत नव्हती! कायद्यांत ती सोय झाली ! संस्थानिकांनी साम्राज्य सरकारला युद्धांत मदत केलीच होती. ब्रिटिश भारतांत वाढू पाहणा-या जबाबदारीच्या राज्यपद्धतीला लगाम घालण्याचे एक साधन म्हणून पुढे मागे संस्थानिकांचा उपयोग करता येईल हे ओळखून, माँटफर्ड-अहवालांत संस्थानिकांचे महिम्नस्तोत्र रचण्यांत आले व १९२१सालीं ‘प्रिन्सेस चेंबरची' प्राणप्रतिष्ठा करण्यांत आली ! साम्राज्याच्या हिताच्या दृष्टीने उठविण्यांत आलेली ही भुतावळ साम्राज्यावरच कशी उलटवितां येईल व तिचाहि उपयोग राष्ट्रहिताच्या वाढीसाठीं कसा करता येईल हा राष्ट्रनेत्यांनी हाती घेण्याचा यापुढील प्रश्न होता. १९१४ च्या महायुद्धाचा हेतु ‘युद्धांची परिसमाप्ति करण्यासाठी चाललेले युद्ध' असा सांगण्यात येत होता; पण, व्हर्सायच्या तहानेच नव्या युद्धाची बीजे पेरून ठेविली होती. राष्ट्रांतील अंतस्थ कलह आंवरून धरणे, राजकीय प्रगतीचे टप्पे झपाट्यानें गांठीत जाणे व नवे जागतिक युद्ध सुरू होण्याच्या सुमारास सारें राष्ट्र स्वातंत्र्योन्मुख व स्वसंरक्षणक्षम बनविणे ही कामे मोठ्या मुत्सद्देगिरीने व्हावयास पाहिजे होतीं ! पण, देशाचे दुर्दैव असे खडतर कीं, लोकमान्य टिळक १ ऑगस्ट १९२० रोजी इहलोक सोडून गेले !