पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पेशव्यांना पानिपतच्या माहिमेंत पहिल्यांदा आला व तो मोठा भयानक आला. त्या वेळी हिंदुस्थानांतील यच्चयावत् लोक मराठ्यांच्या विरुद्ध झाले. पानिपतची शेवटची लढाई होईतोपर्यंत ह्या लोकांचा द्वेष पुरता कळून आला नाही हे कबूल आहे. सदाशिवराव विजयी झाला असता तर तो द्वेष कधी कळूनहि न येता हेहि कबूल आहे. परंतु, अपजय आला असतां हे सर्व लोक आपल्याला खाऊन टाकतील हे समजत असूनहि पेशव्यांनी त्याचा उपशम करण्याची काही एक खटपट केली नाही हेहि कबूल केल्याशिवाय गत्यंतर नाही. जिंकलेल्या लोकांची मनें आकषून घेण्यास व नवीन वळणावर नेण्यास पेशव्यांनी व्यवस्थित प्रयत्न केले नाहीत हा त्यांचा मोठा दोष होता. परंतु तो दुसऱ्या एका दोषाच्या मानाने केवळ क्षुद्र आहे असे दृष्टोत्पत्तीस येईल. मल्हारराव होळकर, गोविंदपंत बुंदेले वगैरे कपटी, कुचर व स्वामिद्रोही सरदारांना ताळ्यावर व वठणीस आणण्यास पेशव्यांनी कांहींच व्यवस्था केली नाही. ह्या सरदारांची स्वामिभक्ति कायम असती ह्मणजे जिंकलेल्या प्रदेशांतील लोकांना जुलमाने वागवूनहि आपली सत्ता पेशव्यांना कायम ठेवितां आली असती. कदाचित् प्रथम प्रथम लहान सहान बंडे झाली असती परंतु घरांतल्या घरांत भेद होऊन नाश होण्यापेक्षां ती बंडे झालेली पुरवली असती. ह्यासंबंधानें रघुनाथरावदादाने एक मार्मिक वाक्य लेखांक २ त लिहिले आहे. तो ह्मणतो, " स्वजनविरोध व परराज्यांतील कलहाचे मूळ अजीपासूनच लागले आहे.” सारांश, शिवाजीप्रमाणेच बाळाजी बाजीरावाने व सदाशिव चिमणाजीने हे स्वजनविरोधाचे बंड आधी मोडून टाकिले पाहिजे होते. सरदारांची मनधरणी करण्याचे काम केवळ दपटशाने किंवा गोड बोलण्याने भागण्याजोगे नव्हते. त्याला रामदासासारखेच तिन्हाईत गृहस्थ सरदारांची कानउघाडणी करण्यास, हिंदुपदपातशाहीची दिशा दाखवून देण्यास व स्वामिभक्तोचें शिक्षण लावण्यास ह्या वेळी हवे होते. परंतु १७५० पासून १७६१ पर्यंतच्या अवधीत रामदासासारिख्यांचा टाहो कांहीं उपयोगी पडला असतां किंवा कसें ह्याची शंकाच आहे. शिवाजीच्या वेळी रामदासाला काही मर्यादित व विवक्षित प्रदेशांत उपदेश द्यावयाचा असल्यामुळे त्याचे बोलणे सर्वांना ऐकू जाणे शक्य होते. आतां महाराष्ट्रसाम्राज्याची मर्यादा बहुतेक आसमुद्र पसरली होती. मराठ्यांचे सरदार हिंदुस्थानांतील दूरदूरच्या प्रदेशांत वर्षेच्यावर्षे वास्तव्य करून राहिले होते. त्यांना स्थानिक प्रीतीने व स्थानिक द्वेषाने पछाडलेले होते. त्यांची व पेशव्यांची भेट दहा दहा पांच पांच वर्षांनीहि झाली तर होत असे. अशांची मनें सन्मार्गी राखण्यास पेशव्यांच्या वतीने शेकडों रामदास वेळोवेळी टोले मारण्यास त्यांजवळ राहिले पाहिजे होते. ज्यावेळी एकहि रामदास सबंद महाराष्ट्रसाम्राज्यांत नव्हता त्यावेळी शेकडों रामदास असण्याची अपेक्षा करणे प्रायः दुरापास्त होते. सारांश, सरदारांच्या उच्छृखलवृत्तीला आळा घालता येण्याजोगी साधनें त्याकाली पेशव्यांच्या जवळ नव्हती असेंच कबूल करणे ओघास येते. सरदारांच्याप्रमाणे जिंकलेल्या प्रांतांतील लोकांची मनें