पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बळकट तर्क करितां येतो. पानिपतच्या मोहिमेंत कुचराई केल्याबद्दल आणि अबदालीशी व नजी. वखानाशी अंतस्थरीतीने व्यवहार केल्याबद्दल पहिल्या माधवरावाने मल्हाररावाचा दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड यास तोव्याखाली बडविले होते हे सुप्रसिद्ध आहे. ह्या आख्यायिकेवर जरी विशेष भिस्त ठेविली नाहीं तत्रापि मल्हाररावाच्या स्वामिभक्तीविषयों व देशभक्तीविषयों विकल्प घेतां येतो हे निर्विवाद आहे. सुरजमलजाट दिल्लीस मराठ्यांच्या सैन्यांतून रुसून सबलगडास गेला व आपल्या मुलाला भाऊकडे पाठवून देण्याचा त्याने विचार केला ह्या गोष्टींचा उल्लेख ह्या ग्रंथांतील पत्रांत आला आहे (लेखांक २५९, २६४, २४४, २१६, २१५). सुरजमलजाट मराठ्यांच्या विरुद्ध गेला नाही व अबदालीलाहि त्याने मदत केली नाही; परंतु अबदालीच्या विरुद्धहि पण तो गेला नाही. गोविंदपंताच्या बरोबरीने किंवा खालोखाल कुचराई करणारे गृहस्थ झटले झगजे गोपाळराव गणेश बर्वे व गणेश संभाजी खांडेकर हे होत. पहिले रघनाथरावदादाचे निकट संबंधी होते. ह्यांनी अंतर्वेदात राहून अबदालीला पायबंद देण्याचे काम केले नाही. हे गोविंदपंताच्या दिमतीला असल्यामुळे गोविंदपंताच्या हुकुमाप्रमाणे ह्यांना वागावे लागले असेल हे उघड आहे. गणेश संभाजीचें पाऊल गोपाळराव गणेशाच्या थोडे पुढे होते. त्याने अंतर्वेदीत अबदालीला पायबंद देण्याचे काम तर केलें नाहींच; उलट बुंदेलखंडांत पृथुसिंग वगैरे संस्थानिकांशी ह्याच वेळी भांडण तंटे उपस्थित करून सदाशिवरावाला या संस्थानिकांकडून काही साहाय्य करून द्यावयाचें तें देवविलें नाहीं (लेखांक २५६, २५७ ). गोपाळराव गणेश व गणेश संभाजी हे दोघे इसम रघुनाथरावाच्या पुठ्ठयांतील होते. ह्यांना कदाचित् सखारामबापूची शिकवणी असल्यास न कळे. येथपर्यंत गोविंदपंतादि मंडळींच्या कृत्यांचा विचार झाला. आतां सदाशिवरावभाऊच्या वर्तनांत कांही कमीपणा दिसतो की काय ते पाहू. १५ नोव्हेंबर १७६० पर्यंत सदाशिवरावाचे वर्तन जसे असावें तसेंच होते. गोविंदपंत अबदालीच्या पाठीमागून येऊन त्याची रसद बंद करील ह्या आशेवर भाऊ पानिपतास तळ देऊन बसला हे रास्त होते. परंतु, १५ नोव्हेंबराच्या सुमाराला गोविंदपंतावर विश्वास व भिस्त ठेवण्यात अर्थ नाही हे भाऊला पके कळून चुकले होते. यद्यपि भाऊच्या सैन्याचा जोर अबदालीपेक्षा जास्त होता, तत्रापि दाणागल्ला मिळण्याच्या दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या संभवामुळे सदाशिवरावभाऊने अबदालीशी मोट्या कडाक्याचे युद्ध मुद्दाम करून त्याचा शह टाळावयाचा होता किंवा त्या प्रकाराने शह टळत नसल्यास त्याची फळी फोडून दिल्लीकडे निघून यावयाचे होते. ह्यांपैकी पहिल्या मार्गाचा अवलंब भाऊनें १५ नोव्हेंबरपासून ७ डिसेंबरपर्यंत करून पाहिला. ह्या अवधीत अबदालीशी दोन बरीच मोठी युद्धे झाली. परंतु ह्या दोन्ही युद्धांत स्वतः अबदाली लढाईला मुळीच आला नाही व त्याची बदनक्षी जी व्हावयाला पाहिजे होती तीहि झाली नाही. मराठ्यांना ह्या दोन्ही युद्धांत जय मिळाला हे निर्विवाद आहे; परंतु त्या जयापासून अवदालीचे फारसे नुकसान न होतां मराम्यांचाहि मोठासा नफा झाला असें नाही. मराठ्यांची जी १५ नोव्हेंबराला स्थिति