पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रंथ स्वाधीन करून पंतांनी पानिपतच्या रोखाने गाजुद्दिनगराकडे कुच केले. परंतु त्या शहराजवळ अबदालीचा सरदार अताईखान त्याने गोविंदपंताला डिसेंबरी गाठून ठार केले (लेखांक २७२ ). कोणत्याहि हेतूने का होईना गोविंदपंताच्या हातून ह्यावेळी अबदालीची रसद बंद केली गेली असती तरी देखील भाऊचे हित झाले असते. परंतु, राजीखुशीनें ज्याच्या हातून पूर्वी हित झाले नाही त्याच्या हातून धन्याच्या भीतीने, लोकांच्या लज्जेने किंवा फलाच्या आशेनें आतांहि हित होऊच नये असाच ईश्वरी संकल्प होता असे दिसते. गोविंदपंत जिवंत होता तोपर्यंत अबदालीला कदाचित् शह बसेल व मराज्यांना कदाचित् रसद मिळेल अशी आशा करण्यास जागा होती. गोविंदपंत वारल्यावर ह्या कादाचित्कत्वाचाहि लोप होऊन बाहेरून साहाय्य मिळण्याचा मराठ्यांना फारच थोडा संभव राहिला. २ जानेवारी १७६१ रोजी पाराशरदादाजी हजार पांचशे स्वार व दीड लाख खजिना घेऊन दिल्लीहून पानिपताकडे जावयास निघाला (लेखांक २८१ व टीप ३२४). तो चार जानेवारीला अबदालीच्या लष्करांत चुकून गेला. तेथे काही स्वार मारले गेले, काही मराठ्यांच्या लष्कराकडे निसटले व कांही दिल्लीकडे परत आले. हा मराठ्यांना साहाय्य करण्याचा दुसरा व शेवटला प्रयत्न झाला. येथें पानिपतच्या मोहिमेसंबंधी ह्या पुस्तकांतील अस्सल पुरावा संपला. ह्यापुढें पानिपतास मराठयांचे काय झालें तें बखरींवरून व तवारिखांवरून ढोबळ रीतीने कळण्यासारखें आहे .१७६१ च्या १४ जानेवारीला झालेल्या पानिपतच्या शेवटल्या युद्धासंबंधी (टोप ३२४) आजपर्यंत अस्सल असें एकहि चिटोरें उपलब्ध झाले नाही. आरळ्याचा कुळकर्णी नारो भगवंत ह्याची ग्रांट डफ्नै घेतलेली जबानी मात्र अस्सल समजण्यास हरकत नाही. परंतु ती पानिपतच्या युद्धाच्या एका शेवटल्या क्षल्लक प्रसंगांसंबंधी असल्यामुळे युद्धाच्या हकीकतीवर प्रकाश पाडण्यास तिचा विशेष उपयोग नाही. अस्सल पुराव्याची काही तरी कसोटी जवळ असल्याशिवाय बखरीतील किंवा तवारिखेंतील अमुक मजकूर विश्वसनीय आहे व अमुक नाही हे सांगणे निव्वळ पक्षपाताचें व आग्रहाचे होईल. पानिपतच्या शेवटच्या युद्धांत विश्वासराव मरेपर्यंत मराठ्यांना जय मिळाला किंवा नाही; विश्वासराव वारल्यावर भाऊच्या मनांत परत जावयाचे असतां, जेव्हां अबदाली चाल करून आला तेव्हां भाऊला निरुपायाने त्याला तोंड देणे भाग पडले किंवा नाही; मल्हारराव होळकर, दमाजी गायकवाड ह्यांनों लढण्याच्या कामी कांहीं कसूर केली किंवा कसें; वगैरे बरेच प्रश्न सोडवावयाचे आहेत; परंतु अस्सल कागदपत्र एखादें सुद्धा जवळ नसल्यामुळे व्यर्थ, किंवा फार झाले तर किंचित् संभाव्य असा निर्णय काढण्याच्या कोरड्या खटपटीत पडण्याची माझी इच्छा नाही व काही फायदाहि नाही. शिवाय खुद्द लढाईसंबंधी अस्सल कागदपत्रे पुढे मागें बाहेर येण्याचा संभव नाहींच असे नसल्यामुळे मी त्या वादांत सध्यां शिरत नाही. वाकी तो वाद बराच महत्त्वाचा व मनोरंजक होण्याचा संभव आहे.