पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ अबदालीने शहाजादा अलीगोहर व मीरजाफरअल्ली,पटण्याचा सुभेदार, ह्यांनाहि आपणाकडे मिळवून घेण्याचा प्रयत्न पूर्वीपासून चालविला होता. परंतु अल्लीगोहराने त्यांजकडे जाण्याच अनेक कारणांकरितां नाकारिलें (लेखांक २२७ व २१९). सारांश, अबदालीची ह्यावेळी अगदी विपन्न स्थिति झाली होती. नजीबखानाच्या नादी लागून व्यर्थ संकटांत मात्र पडलों असें अबदालाला वाटू लागले. हिंदुस्थानची पातशाही मिळवून देण्याच्या नजीबखानाच्या गप्पांना मुलन आपण आपला सर्वस्वी नाश करून घेण्याच्या पंथाला लागलों असें अबदालीच्या प्रत्ययास आले. खरे पाहिले असतां अबदालीला हिंदुस्थानच्या कारस्थानांत डवचाडवच करून लभ्यांश लुटीखेरीज काहींच नव्हता. त्याला हिंदुस्थानांत कायमचे राहावयाचे नव्हते. त्याचे हिताहित हिंदुस्थानांत यत्किंचित्हि नसून त्याचे सर्व काही खैबरखिंडाच्या पश्चिमेकडे गुंतलें होतें. हिंदुस्थानांत स्वारी करून, दोन चार महिने राहून, मिळेल ती लूट घेऊन विलायतेस निघून जाण्याचा त्याचा परिपाठ असे. ह्या खेपेला नजीबखानाच्या आग्रहाला मान देऊन तो हिंदुस्थानांत राहिला. परंतु त्या राहण्यापासून काही फायदा नाही हे त्याला दिवसेंदिवस जास्त अनुभवास येऊ लागले. त्याचे लोकहि हिंदुस्थानांत दहा महिने राहून कंटाळून गेले होते. काहींनी तर अफगाणिस्थानचा रस्ता सुद्धां सुधारला. काही सदाशिवरावाच्या चिट्या घेऊन गोविंदपंताकडे इटाव्याच्या बाजूला मराठ्यांना जाऊन मिळाले ( लेखांक २३३,२३७, २४२, २४४ ). येणेप्रमाणे स्वकीय व परकीय अशा दोन्ही लोकांनी त्याला सोडण्याचा क्रम जव्हां आरंभिला तेव्हां मराठ्यांशी स्नेह करून स्वदेशास आपणही सुरक्षित निघून जावें असा अबदालीने निश्चय केला ( लेखांक २३६ व २४६ ). स्नेहाचे बोलणे करण्याकरितां भाऊकडे त्याने वकीलहि पाठविले. परंतु त्यांजकडील राजकारणाचा आपल्या मनाप्रमाणे बनाव बसण्याला वराच अवधि लागेल हे पाहून भाऊनें त्याच्या वकिलांच्या बोलण्याकडे विशेषसे लक्ष दिले नाही ( लेखांक २३७ ). अबदालीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष्य करण्याजोगीच भाऊची ह्यावेळी स्थिति होती. अबदालीच्यापेक्षां सर्वतोप्रकारे श्रेष्ठ असें सैन्य भाऊजवळ होतें. अबदालीने कधी पाहिला नाही असा तोफखाना भाऊच्याबरोबर होता. ज्या शिंद्यांना सहा महिन्यांपूर्वी अवदालीने नाडिलें होतें त्यांच्याबद्दल यथेच्छ सूड उगविण्याची भाऊच्या मनांत सोत्कंठ ईर्षा होती. शहाजादा अलीगाहर याचाहि कल भाऊकडेच येण्याचा होता. तशांत अबदालीच्या सैन्यांत फुटफाट झाली होतीव आणीक होण्याचा संभव होता ( लेखांक २२४). तेव्हां अशा वेळी अबदालीला सोडावयाचा नाही असा भाऊने निश्चय केला. अबदालीने मनाप्रमाणे तह केल्यास मात्र त्याला देशी सुखरूप जाउं द्यावयाचें; नाही तर, अंतर्वेदांत कोंडून किंवा आंत तडफडून यमुना उतरून अलीकडे आल्यास बाहेरून गांठून त्याला तंबी द्यावयाची असा व्यूह भाऊनें रचिला ( लेखांक २५८). हा व्यूह तडीस नेण्यास लागणारी साधनें भाऊजवळ जय्यत तयार होती. भाऊ आगष्टपासून अक्टोबरपर्यंत दिल्लीस होता. हे तीन महिने पावसाळ्याचे असल्या. मुळे सैन्याची हालचाल करणे बरेंच अडचणीचे होते. तशांत दिल्लीस राहून भाऊला