पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अबदालीला पूर्वेकडे कोळजळेश्वर, सकुराबाद वगैरे ठाण्यांवरून रेटीत गोविंदपंताच्या अंगावर नेऊन सोडावें. ह्या योजनेच्या साधनार्थ सदाशिवराव स्वतः मथुरेच्या दिशेने चालता झाला व गोविंदपंतानें कोळजळेश्वर ऊर्फ अलीगडपर्यंत मराठ्यांची ठाणी बसवावी, अबदालीच्या भोवतालचा मुलूख वैराण करावा, रोहिल्यांच्या मुलुखांत सोरमच्या घाटानें उतरण्याची अवाई घालावी व सुजाउद्दौल्याच्या प्रांतांत दंगे माजवावे असे त्याने ठरविलें. सदाशिवराव १६ जुलैला मथुरेस आला (लेखांक २१७), तेथून शिंदे, होळकर व बळवंतराव गणपत यांस त्याने दिल्लीस पुढे रवाना केले व स्वतः ३० जुलैला त्या शहरी जाऊन पोहोंचला ( लेखांक २२४ ). दिल्लीशहर बळवंतराव मेहेंदळ्याने अगोदरच सर केलें होतें (लेखांक २२३). आंतील किल्ला घ्यावयाचा राहिला होता तो सदाशिवरावभाऊ आल्यावर १ आगष्टाला मराठ्यांच्या हाती पडला. याकूब अल्लीखान ह्मणून अबदालीचा कोणी सरदार किल्ल्यांत होता, तो एकटाच इतर लोकांना टाकून नावेतून पळून गेला ( लेखांक २४६ ). किल्ल्याच्या आंत अबदालीकडील लोक होते त्यांस कौल देऊन हत्यारांसुद्धा बाहेर काढून दिले व पावसाळा सुरू झाला ह्मणून मराठे दिल्लीभोवती सुमारे दोन महिने तळ दफन राहिले. मराठ्यांनी दिल्ली घेतली ही बातमी हिंदुस्थानांत लवकरच पसरली. दिल्ली शहर ह्मणजे चकत्यांच्या पातशाहीचे मुख्य ठिकाण. ते मराठ्यांनी अबदालीच्या लोकांपासून हिसकावून घेतले ह्या गोष्टीने मराठयांचा दरारा पूर्वी होता त्यापेक्षांहि आत' ज्यास्त वाढला व त्याच मानाने अबदालीचा कमी झाला. खुद्द अबदालीच्या सैन्यांत त्याच्या साथीदारांत फूटफाट होऊ लागली. हफीजरहिमतखान, अहमतखान चंगष, सादुल्लाखान, फैजल्लाखान वगैरे रोहिल्यांची राजकारणे भाऊकडे. पूर्वीपासूनच लागली होती. ह्या लोकांना मराठ्यांनी दिल्ली घेतल्यापासून अबदालीच्या बलाचा व सामर्थ्याचा संशय येऊ लागला व ते त्याच्यापासून विभक्त होण्याची खटपट करूं लागले. कित्येक गिलचे व अफरीदी लोकहि अबदालीला सोडून निघाले (लेखांक २३३). सुजाउद्दौल्यालाहि आपण अबदालीला मिळालों ह्या गोष्टीचा खेद वाढू लागला. अबदालीने सुजाउद्दौल्यावर मारेकरी घातले व त्याच्यापाशी तो ख करितां पैसा मागू लागला. नजीबखानाने सुजाउद्दौल्याला अबदालीकडे आणिला,त्यांतील मुख्य हेतु सुजाकडून पैसे काढावयाचे हा होता ( लेखांक २०४ ). सुजापाशी अबदाली जेव्हां पैसा मागू लागला तेव्हां त्या तरुण व उल्लू मनुष्याला नजीबखानाच्या कुंटणपणाचें व अबदालीच्या मतलबाचे इगित कळले (लेखांक २४६ ). सुजाउदौल्याला तेव्हापासून अबदालीच्या संगतीचा अगदी वीट आला. आपली आई, सदाशिवरावभाऊ, मल्हारराव होळकर, वगैरे मंडळींनी अबदालीला न मिळण्याविषयी आपल्याला आग्रहपूर्वक सांगितले असून आपण त्यांचे ऐकिलें नाहीं हा मूर्खपणा केला व नजीबखानासारख्या मात्रागमनी लुच्चाच्या नादी लागून फसलों असें त्याचं त्यालाच वाटू लागले. ह्याकरितां तोहि सदाशिवरावाशी सख्याचे बोलणे करूं लागला. ह्याप्रमाणे अबदालीला ह्यावेळी त्याच्या सर्व साथीदारांनी सोडून देण्याचा उद्योग आरंभिला.