पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देव आणि गोविंदपंत बुंदेले, वगैरे गृहस्थांची नांवें प्रमुखत्वाने उल्लेखितां येतात. १७५० पासून १७६० पर्यंत ह्या इसमांच्या उद्योगाचें त्रोटक वर्णन खाली देतो. १७४६।१७४७ त मल्हारराव होळकर व जयाजी शिंदें बुंदेलखंडांत कालिंजर, जैतपूर, अजेगड वगैरे स्थली लढत होते ( का. पत्रे, यादी वगैरे ६२,६९,७४ ). ह्या स्थली दाखविलेल्या शौर्याबद्दल मल्हाररावाची बाळाजीनें बहुत स्तुति केली आहे. १७४९ त मल्हारराव होळकर साता-यास बाळाजीचा पाठिंबा करण्याकरितां आला होता. १७५० त मल्हाररावाचे व जयाप्पाचे वितुष्ट पडलें होतें असें लेखांक २ वरून कळतें. ह्यावेळी तारावाईनें मल्हाररावाला आपल्या बाजूस ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु मल्हाररावाने बाळाजीचा पक्ष सोडिला नाहीं (का. पत्रं, यादी वगैरे ३५९). १७५१ त सलाबताने बाळाजीला कुकडी नदीवर नाडिले त्यावेळी वाळाजीनें मल्हाररावाची पायधरणी केली. तेव्हा मल्हाररावाने जयाप्पाच्या द्वारा बाळाजीकडे शपथपूर्वक बेलभंडार पाठविला ( का. पत्रे, यादी वगैरे ३६३ ). १७५२ च्या आगष्टांत मल्हारराव व जयाप्पा दक्षिणेस आले व१७५२ च्या डिसेंबरांत ते भालकीच्या लढाईत हजर होते. पुढे १७५४ त कुंभेरीस मल्हाररावाचें व जयाप्पाचें वाकडे आले. जयाप्पावर मारेकरी घालण्याची प्रथम सूचना मल्हाररावानेच केली ह्मणून कित्येकांनी शंका काढिली आहे. ह्या वेळेपासून मल्हारराव शिंद्यांचा व पेशव्यांचा द्वेष करूं लागला. १७५७ त मल्हाररावानें लटकींच लचांडे काढून रघुनाथरावास त्रास दिला ( लेखांक ५२,६७,७१). पेशव्यांची सत्ता अपरंपार झाली हे पाहून ह्यावेळी मल्हारवाराने नजीबखानाचे संरक्षण केले आणि दत्ताजीस व जनकोजीस पेशव्यांच्या विरुद्ध जाण्याचा इतिहासप्रसिद्ध उपदेश केला. ह्याच वेळी रसदेच्या पैशासंबंधानें मल्हाररावाचें व पेशव्याचें वैमनस्य आले. १७५९ त दत्ताजीचें व अबदालीचे युद्ध चाललें असतां मल्हारराव जयपूरप्रांती लहान सहान गढ्या घेत बसला व दत्ताजीला त्याने मदत केली नाही. दत्ताजीला मदत करण्यास जाण्याविषयी बाळाजी बाजीरावानं मल्हाररावाला बरीच पत्रे पाठविली ( लेखांक १५६,१५७,१६१). परंतु, दत्ताजी बडाउंच्या (१० जानेवारी १७६०) लढाईत पडून जनकोजी कोटपुतळीस पळून येईतोपर्यंत ( १२ जानेवारी १७६० ) मल्हाररावाने जयपूरप्रांत सोडिला नाहीं (लेखांक १५३ ). ह्या दहा पंधरा वर्षाच्या हालचालीवरून मल्हारराव होळकराच्या मनाची स्थिति ताडतां येते. १७५० पासून हळू हळू त्याचे मन शिंद्याविषयी व पेशव्यांविषयीं कलुषित होत चालले होते. १७६० त तर ह्या कलुषतेचा कळस होऊन होळकराची मदत मिळाली नाही ह्मणून दत्ताजीचा नाश झाला." दोन्ही सरदार एकत्र असलियास उत्तम रीतीने पठाणाचें पारपत्य होईल," ह्मणून रघुनाथराव, सदाशिव चिमणाजी व बाळाजी बाजीराव वारंवार लिहीत ( लेखांक १५२ वगैरे ) असतां मल्हाररावाने त्यांचा हुकूम अमलांत आणण्याचे होतां होईल तितकें लांबणीवर टाकिलें. (टीप २१५ पहा ). सारांश, १७६० च्या प्रारंभी शिंद्यांविषयीं व पेशव्यांविषयीं होळकराच्या मनांत द्वैतभाव अत्युत्कट भरला होता,