पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांपडला. त्यांत सप्तसमुद्रात्मक पृथ्वी शेषाच्या मस्तकावर दिली असून, चीन, इंग्लंड, रावणाची लंका वगैरे देशांच्या दिशा स्थूल मानाने बरोबर दाखविल्या आहेत व हिदुस्थान चतुष्कोणाकृति काढिला असून तासगांव हिदुस्थानचा मध्य धरिला आहे. परंतु हे भूगोलज्ञान सामान्य जनांचें झाले. स्वतः पेशवे व त्यांचे सरदार ह्यांचे भूगोलज्ञान ह्या लोकांच्यापेक्षा अर्थात् जास्त विस्तृत व व्यवस्थित असे. फिरंगी, फराशिस, वलंदेज, डिंगमार, आळंदोर, दुराणी, तुराणी, अरब, गिलच्ये, हबशी, शामळ, तुर्क, यवन, इराणी, शिद्दी, इंग्रज, मोरस, आफरीदी, वगैरे अठरा टोपीवाल्यांचे देश, व हिंदुस्थानांतील राजांचे छपन्न देश पेशव्यांना व त्यांच्या मुत्सद्यांना कित्येक नांवाने व कित्येक स्वदृष्टीने माहीत होते. देशोदेशीचे वकील पेशव्यांच्या दरवारी मोठ्या इतमामाने रहात असत (का. पत्रे, यादी वगैरे १३४). त्यांजपासूनहि त्यांच्या देशांची माहिती पेशव्यांना मिळत असण्याचा अवश्य संभव आहे. हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रांतांचे नकाशे पेशव्यांजवळ असत. लढाया झाल्या ह्मणजे तह ज्याअर्थी होत त्याअर्थी पेशव्यांजवळ नकाशे असत हे मुद्दाम सांगण्यांत विशेष मुद्दा आहे असें नाही. महाराष्ट्रांत बखरी वाचण्याचा व लिहिण्याचा प्रघात फार असे. तेव्हां मराट्यांच्या व यवनांच्या इतिहासाचे ज्ञान महाराष्ट्रांत बहुश: सार्वत्रिक होते असें ह्मणण्यास प्रत्यवाय नाही. पाणिपतच्या बखरीचा कर्ता रघुनाथ यादव याने त्या बखरीच्या १९ व्या पृष्ठावर मराठ्यांच्या सर्वव्यापी सत्तेचा पसार कसकसा होत गेला व सर्व हिंदुस्थान हिंदुमय करून टाकण्याचा मराठ्यांचा मनोदय होता वगैरे गोष्टी अबदालीच्या तोंडून वदविल्या आहेत. त्यावरून इतिहास व भूगोल ह्यांचे ज्ञान रघुनाथ यादवाला थोडे थोडके नव्हते असे दिसून येते. रूमशाम ह्मणजे कुस्तुंतुनिया येथे इ. स. १७३० पासून १७५४ पर्यंत राज्य करणाऱ्या सुलतान महमदाचेंहि नांव रघुनाथ यादवाला माहीत होतें (र. या. पा. व. पृ. १९, टीप) असें त्यावरून ठरतें. भूगोल व इतिहास ह्यांची माहिती बाळाजी बाजीरावाला व सदाशिव चिमणाजीला आपल्या कामापुरती यथास्थित होती ह्यांत संशय नाही. परंतु, युरोपांत तत्कालीन दरबारांतून ह्मणजे पंधरावा लई, बडा फ्रेडरिक, दुसरा जार्ज ह्यांच्या दरबारांतून व राज्यांतून भूगोलाचे व इतिहासाचें जें ज्ञान त्यावेळी होते त्याच्या मानाने पेशव्यांच्या दरबारचे इतिहासाचे व भूगोलाचे ज्ञान अगदीच क्षुद्र होते हे कबूल करणे योग्य आहे. कपिल, कणाद वगैरे पुराणमुनींनी प्रणीत शास्त्रांच्या व्यतिरिक्त यूरोपांत ठाऊक असलेल्या शास्त्रांचा गंधहि पेशव्यांच्या राज्यांत कोणाला नव्हता. पाठशाला, विद्यापीठे, विद्वत्सभा, अजबखाने, वादसभा, शोधसभा, पृथ्वीपर्यटणे, वगैरे यूरोपियन संस्था पेशव्यांच्या राज्यांत नव्हत्या इतकेंच नव्हे; तर त्या दुसरीकडे कोठे आहेत किंवा काय ह्यांचाहि पत्ता महाराष्ट्रांत कोणाला नव्हता. ह्या नकारात्मक वाक्यांचा इत्यर्थ एवढाच की १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात व उत्तराधीत मराठ्यांची संस्कृति यूरोपांतील प्रगत राष्ट्रांच्या संस्कृतीहून कमी दर्जाची होती. ती कोणकोणत्या गोष्टीत तशी होती त्याचा अंशतः निर्देश वर झालाच आहे. एक दोन विशेष मुद्यांचा विचार पुढें करितो.