पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४७)

होता; कसलेला योद्धा होता; रणविद्याविशारद सेनानायक होता; मोठा करारी, निश्चयी व बाणेदार वीर पुरुष होता; सतराव्या शतकाच्या प्रारंभी भोसल्यांचे घराणे उदयास येण्यापूर्वीच फलटणचे निंबाळकर, मलवडीकर, घाटगे, मोरे, शिर्के, महाडिक, गुजर, मोहिते वगैरे मराठा सरदार घराणीं प्रसिद्धीस पावलेली होतीं, आति त्या सर्वांत शिंदखेडकर जाधवांचे महत्त्व तर परमावधीसच गेलेलें होतें. ज्या वेळीं निजामशाहीच्या इतिहासांत मलिकंबर, मालोजी व शहाजी हीं नांवेही प्रसिद्धीस पावलेली नव्हती, त्या काळांत लुकजी जाधवराव हाच निजामशाही राज्याचा एक प्रमुख आधारस्तंभ होता; मोंगल बादशहा अकबर याचा मुलगा शहाजादा मुराद यानें अहमदनगर शहरास वेढा दिला, त्यावेळी ( इ० सन १५९४ मध्यें ) प्रसिद्ध चांदबिबी हिनें जो अलौकिक पराक्रम गाजविला, व पुढे निजामशाही जगविण्याकरितां तिनें जे अविश्रांत परिश्रम घेतले, त्यांत जाधवरावानें प्रमुखत्वानें भाग घेतलेला होता; आणि मोगलांच्या दुसन्या हल्लयांत, चांदबिबीचा खून झाल्या नंतर, व अहमदनगरचा किल्ला मोगलांच्या हात गेल्यानंतर (इ० सन १६०० ) लुकजी जाधवरावानें दुसरें सरदार जमा करून, अज्ञान राजास पळवून दुसरीकडे नेऊन निजामशाहीचें आयुष्य काही काळ लांबधिलें होतें; तो निजामशाहीतील दहा हजारांचा एक मोठाच बलाढ्य मनसबदार होता; त्याने आपल्या बाहुबलाने निजामशाही राज्य कांही काळ जगवीत ठेविलें होतें; निजामशाहीची किसमत कांही काळ लुकजीच्या किसमतीत मिसळलेली होती; " आपण म्हणूं ती पूर्व दिशा " असा एके काळी निजामशाहीत त्याच्या सद्दीचा जोर होता; जोपर्यंत लुकजीच्या नशिबाचे तारे त्याला अनुकूल राहून शुक्राच्या तान्या. प्रमाणें निर्वेधपणें चमकत होते, जोपर्यंत जाधवरावाच्या नशिबांचे फांसे, तो मागेल, त्या वेळीं म्हणेल त्या ठिकाण, व फेंकील त्या जागी त्याला पाहिजे तें, आणि तो इच्छील तेंच अगदी तंतोतंत दान त्याच्याकरितां सारखे फेंकीत होते, तोपर्यंत निजामशाहीच्या राजकीय रंगपटावरील प्रत्येक डाव तो सारखा जिंकीत राहिला होता; परंतु फिरत्या कालचक्राबरोबर त्याच्या नशिबाचे फांसे फिरलें; आणि त्याचें व मलिकंबराचें सख्यत्व नाहींसें होऊन त्याच्या वर्चस्वास साफ ओहोटी लागली | शहाजी जिजाबाई यांचा विवाह-