पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४६)

 तथापि निजामशाही राज्याचा हा पुन्हां परत मिळविलेला घांस सहज 'घशाखाली उतरवून पचवून टाकणें मलिकंबर यांस शक्य नव्हतें; बलिष्ठाच्या पंजाखाली गेलेला प्रदेश परत हिसकून ताब्यांत मिळवितां आला तरी तो कितपत आपल्या ताब्यांत ठेवितां येईल याचा संशयच होता; आणि बलि- ष्ठाच्या केलेल्या आगळिकीचे परिणाम निसंशय भोगावे लागणार, हेंही मलि- कंबर हा पूर्णपणे जाणून होता. मोंगल बादशहा जहांगीर याला मलिकंबर यानें केलेली ही आगळीक समजल्याबरोबर तो अतीशय संतापला; आणि त्याने आपला कर्तृत्ववान व पराक्रमी मुलगा जो शहाजहान, त्याला ताबडतोब दक्षिणत पाठवून निजामशाहीचा नकशा उतरण्याचा, व मलिकंबरला नामशेष करून त्यानें ताब्यांत घेतलेला प्रदेश पुन्हां इस्तगत करून घेण्याचा हुकून दिला; त्याप्रमाणे शहाजहान हा ताबडतोब दक्षिणेत येऊन धडकला, आणि निजामशाही नामशेष करण्याच्या उद्योगास त्याने निरनिराळ्या प्रकारें मोठया उत्साहानें व नेटानें प्रारंभ केला.

 मध्यंतरी मलिकंबर यानें मोंगलांच्या तांब्यांतून निजामशाही प्रदेश हस्तगत करून घेतल्यानंतर, आदिलशाही प्रदेशास उपद्रव देण्याचा व आदिलशाहीस तंबी देण्याचा उपक्रम आरंभिला होता; त्यामुळे स्वाभाविक रीत्याच अदिलशहा व मलिकंबर यांची जूट फुटलेली होती, ही गोष्ट शहाजहानच्या चांगलीच पथ्यावर पडली; व त्यानें इब्राहीम अदिलशहास आपल्या पक्षांत लागलीच मिळवून घेतलें; व निजामशाही राज्यांतील फुटतील तितके सरदार, दरकदार, व मनसबदार फोडून आपल्या पक्षास मिळवून घेऊन आपला पक्ष प्रबळ, व निजामशाहीचा दुर्बळ, करण्याचा शहाजहान यानें सारखा प्रयत्न सुरू केला; व लुकजी जाधवरावांसही त्यानें या जुटातून फोडिलें; म्हणजे निजामशाहीच्या जुटीच्या बळांतील साह्यकारी सत्ताधारी इब्राहीम अदिलशहा व निजामशाही- तील पराक्रमी सरदार व मदतगार लुकजी जाधवराव हे उभयतां या जुर्टीतून शहाजहान यानें फोर्डिलें, व त्यांच्या मदतीनें मलिकंबर व शहाजी या उभयतांना नामशेष करून निजामशाही पालथी घालण्याचा त्यानें घाट घडविला.

 लुकजी जाधवराव हा निजामशाहीत एक महत्त्वाचा मनसबदार होता; -सरदार होता; तो मोठा शूर होता; कर्तबगार, करारी व करामती मर्द गडी