पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२९५)

मात्र राजा म्हणून गादीवर ठेवून राज्याचा सर्व कारभार आपल्या हातीं ठेवावा, असा त्यांचा प्रयत्न होता; आणि प्रतापसिंह हा नुकताच गादीवर आल्यामुळे, त्याला राज्यकारभार चालविण्याचा अनुभव नसल्यानें, आपल्या इच्छेप्रमाणे राज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती येतील, अशी त्यांना आश होती. तथापि प्रतापसिंह हा जात्याच बुद्धिमान, स्वाभिमानी आणि व्यवहार- चतुर असल्यामुळे, त्यानें या उभयतांही प्रबल मुसलमान सरदारांचा पूर्ण बंदोबस्त करण्याचा निश्चय केला. परंतु ही गोष्ट त्यांना समजल्यामुळे त्यांनी अनेक कारस्थान रचून प्रतापसिंहास पदभ्रष्ट करण्याचा उद्योग आरंभिला.

 'श्रीमत, भोंसले-वंश-चरित्र' या शिलालेखामध्ये सय्यदखानाच्या प्रमत्त- पणाचें व दुराचाराचें जे वर्णन केले आहे, त्यावरून 'तो दरबारी लोकांस फारच शिरजोर होऊन तंजावरच्या गादीवर काय संकट आणील, याचा नेम नव्हता. तंजावर येथील राजसत्ताही हिंदूंची असल्यामुळे, तेथे पूर्वापार व्यंकोजी महाराजापासून दानधर्म बहुत चालत आला होता. प्रतापसिंह राजे हे गादी- बर आल्यानंतर, त्यांनी आपल्या पूर्वजांचा कित्ता गिरवून पूर्वी- पार चालत आलेले दानधर्म तसेच चालू ठेविले. सय्यदखान यास ही गोष्ट पसंत न पडून, तो हिंदु धर्मास विरोध करूं लागला; आणि हिंदु देवालयांत त्याने अनाचार सुरू केले. त्यानें मोहना नांवाची एक देवालयांतील देवदासी भ्रष्ट करून तिला आपल्या घरी नेऊन ठेविलें. त्यामुळे त्याच्याविषयों हिंदु- धर्माभिमानी लोकांस तिरस्कार उत्पन्न झाला. प्रतापसिंह महाराजास हीं त्याच दुष्ट कृत्ये कळून चुकलीं; परंतु त्यांनी तंजावर येथील त्याचें प्राबल्य लक्षांत घेऊन, त्याच्या कृत्यांकडे कांही दिवस कानाडोळा केला. अर्थात् सय्यदखानास त्यामुळे अधिकच उत्तेजन येऊन, तो तंजावरची सर्व राजसत्ता आपल्या मुठीत आणण्याचा अधिक प्रयत्न करूं लागला. तंजावरचें राज्य काबीज करण्याच्या खटपत असलेल्या प्रसिद्ध चंदासाहेबाकडे त्यानें गुप्त रीतीनें राजकारण सुरू केले आणि त्याच्या मुलास आपली मुलगी द्यावी, व त्याच्या साह्यानें तंजावरचें राज्य हस्तगस करून ते आपण चालवावें, अशी मसलत योजिली. परंतु ही गोष्ट प्रतापसिंहास समजली व त्यानेंहि मोठ्या शहाणपणानें सय्यदखानाचें खूळ तंजावर मधून नाहीसे करण्याचा विचार