पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २९४ )

प्रदेश फ्रेंचांस मिळाला, व चंदासाहेबानें अशा रीतीने या वेळी तंजावरच्या राज्यावर आपला सूड उगवून घेतला.

 राजे बयाजी याच्या कारकीर्दीत तंजावरची राजसत्ता लष्करी डोकांच्या- आणि तीहि मुसलमान सत्ताधारी सय्यदखान व त्याचा भाऊ सय्यदकासीम यांच्या हाती गेल्यानंतर सर्व तंजावरच्या राज्यभर बेबंदशाही माजली. आणि गृहकलह, परस्पर मत्सर, द्वेषबुद्धि, सत्ताभिलाष इत्यादि राष्ट्रविनाशक दुर्गुणांचा प्रादुर्भाव होऊन तंजावरचें राज्य रसातळास जाणार की काय, अशी भीति वाटू लागली. परंतु अशा संकटप्रचुर प्रसंगी तंजावर येथील मल्हारजी गाडेराव, मानाजी जगताप व अनप्पा शेडगे प्रभृति मुख्य सरदा- रोनी जनतेचा कल पाहून, तंजावरच्या गादीवर योग्य पुरुषाची योजना करण्याचा संकल्प केला आणि तुकोबांच्या विद्यमान चिरंजीवांपैकी प्रतापसिंह या नांवाचा जो दासीपुत्र होता, तोच राजपदास सर्व गुणांनी युक्त आहे असें पाहून त्यास (इ. सन १७३९ च्या अखेरीच्या सुमारास ) सिंहासनारूड केलें. अशा प्रकारें, सर्व प्रजेच्या अनुमतीनें रूप, गुण, क्रिया, बुद्धि, या सर्व गुणांनी युक्त असा दासीपुत्र गादीस योग्य अधिपति ठरविल्याचें हें तंजावरच्या इतिहासांतील उदाहरण लक्षांत ठेवण्यासारखे आहे. व " प्रतापसिंहाची माय राजाच्या समाजातीची झाली; करितां हा पुत्रच राज्यास योग्य म्हणन सर्व- त्रांनी निष्कर्ष करून, शके १६६१ सिद्धार्थीनाम संवत्सरे प्रतापसिंह राजास तक्तनशीन केले." ( पारसनीकृत, तंजावरचें राजघराणे, हे पुस्तक पहा.) है तंजावरच्या शिलालेखांतील वाक्य विशेष महत्वाचें व मनन करण्या- सारखे आहे.

 राजे प्रतापसिंह याची कारकीर्द तंजावरच्या इतिहासांत अनेक दृष्टीनें अत्यंत महत्वाची आहे. तुकोजचा दुसरा मुलगा सयाजी याच्या काळापासून तंजावरची राज्यसूत्रे लष्करी लोकांच्या हातांत गेली होती, ती ह्या वेळेपर्यंत तशीच त्यांच्या हातीं होतीं. सय्यदखान व सय्यदकासीम हे या काळांत विशेष प्रबळ बनले होते. हे उभयतांही सय्यदबंधू महाकारस्थानी व सत्ताप्रिय असून त्यांच्याकडे राज्याची फौजदारी, तंजावरच्या कोटाची किल्लेदारी व राजाची चिटणीशी असे मोठमोठे अधिकार होते. सयाजीप्रमाणेच प्रतापासहास नाम-