पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २८४ )

ह्याच अवधीत मराठघांची जिंजी+ येथील राजकारणे घडून आली आहेत. शहाजी गादीवर आला, त्याच्या अदल्याच वर्षी ( इ० सन १६८६ मध्ये ) औरंगझेबानें विजापुरचें राज्य बुडविले. व शहाजी गादीवर आला त्याच वर्षी [ इ० सन १६८७ मध्ये] त्याने गोवळकोंडे येथील राज्य बुडविलें, व आपला सरदार कासीमखान यांस तिकडे पाठवून सर्व कर्नाटक व दक्षिण हिंदुस्थान त्याने आपल्या स्वामित्वाखाली आणण्याचा मोठ्या जोरानें प्रयत्न आरंभिला.

 त्यानंतर इ० सन १६९० मध्ये औरंगजेबानें छत्रपति संभाजी याचा वध केला. त्यावेळी त्याची साध्वी, स्वार्थत्यागी थ आत्मयज्ञपूर्ण अलौकिक स्त्री येसूबाई, व बालयुवराज शिवाजी ऊर्फ शाहूराजे ही उभयत रायगड येथील किल्लयावर होतीं. मोंगलांनी सतत दहा महिने हा किल्ला हस्तगत करून घेण्याची शिकस्त केली; परंतु किल्ला त्यांच्या हाती आला नाहीं. अखे रीस मोगल सरदार ईतिकदखान याने किल्लयांत फितूरी करण्याचा यत्न चाल- विला. त्यावेळी सूर्याजी पिसाळ या नांवाचा वाई येथील मराठा देशमूख राय- गड किल्लयाचा किल्लेदार होता. तो, वाईची देशमुखी औरंगझेबाकडून देववि ण्याचें, खानाकडून वचन घेऊन, मोंगलास सामील झाला; व त्यानें किल्लयाचे दरबाजे उघडून शत्रूस आंत घेतले. त्यामुळे किल्ला मोंगलांच्या हस्तगत झाला .[ इ. सन १६९० च्या अखेरीस ]. आणि येसूबाई व शाहू या उभयतांना खानानें कैद करून औरंगझेबाकडे नेलें. x संभाजीचा वध झाल्यावर, राय- गड मोगलांच्या ताब्यांत जाण्यापूर्वी मराठेशाहीच्या सर्व सरदार व मुत्सद्दी


 + जिंजी (Gingee) हा खेडेगांव व किल्ला, दक्षिण अर्काट [कडलूर ] जिल्ह्यांत, किस्तनागिरी ( Kistnagiri ) पासून समूद्रकिनाण्याकडे जी सडक जाते, त्या सडकेवर, त्रिवेंद्रमपासून अजमार्से अठरा मैलांवर आहे.

 xही सर्व हकीकत पुढील इतिहासांत साद्यंतपणे येणार असल्याने त्रोटक- रीत्याच तिचा या ठिकाणी उल्लेख केला आहे. रायगड किल्ला मोंगलांच्या हाती आल्यावर इतिकदखान हा सूर्याजी पिसाळ यांस आपणांबरोबर औरंगझेबाकडे घेऊन गेला; व त्याची बादशाहाशी भेट करविली. त्या वेळी, बादशहानें “तूं