पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७९)

यांचे आजे मालोजीराजे, व वडील शहाजीराजे यांचें हें शेवटचें विश्रांति- स्थान असल्यानें तें महाराष्ट्राला, व महाराष्ट्रीयांना केव्हाही सर्वथैव पूज्यच व वंदनीयच आहे.

 शहाजी मृत्यु पावला, त्यावेळी कर्नाटक ऊर्फ बंगलोर प्रांताची जहागीर व तंजावर, पोटो नोव्हो व अरणी हे प्रांत त्याच्या ताब्यात होते. त्यांपैकी अरणी प्रांताचा कारभार, वेदो ऊर्फ वेदोजी भास्कर या नांवाचा एक ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण सरदार पहात असे. हा सरदार मोठा शूर, व शहाजीच्या अतीशय विश्वासांतील होता; व तो पुढे रघुनाथपंत हणमंत्या- प्रमाणेच व्यंकोजीचा पक्ष सोडून, शिवाजीस मिळाला. त्यास आठ मुलगे असून, मराठेशाहीतील दक्षिण हिंदुस्थानांतील हें एक प्रसिद्ध व प्राचीन घराणे आहे; व या घराण्यानें मराठेशाहीची पुष्कळ कामगिरी बजाविली आहे. वेदोजी भास्कर हा शिवाजीस जाऊन मिळाल्यामुळे, व्यंकोजी हा


 *अरणी हैं ठिकाण उत्तर अर्काट जिल्ह्यांत चेयाईर नदीच्या पूर्व- किनाऱ्यावर, अर्काटपासून सोळा मैलांवर आहे. अरणी हैं एक जहागिरीचे ठिकाण असून ती जहागीर वेदो भास्कर या नांवाच्या एका देशस्थ ब्राह्मणाच्या घराण्याकडे आजतागायत चालू आहे; या जहागिरीत १८२ गांवें असून तिचे क्षेत्रफळ औरस चौरस १८३ मैलांचे व उत्पन्न अजमार्से दोन लाखां- वर आहे. येथील किल्ला पूर्वकाळी मोठा प्रसिद्ध असून तो हल्लीं मोडकळीस आला आहे, व येथील " देवोपुरम् " हे मंदीर प्रसिद्ध, प्राचीन व प्रेक्षणीय आहे.

 तंजावर है मद्रास इलाख्यांत रेल्वेनें मद्रासपासून २१७ व त्रिचनापल्ली- पासून ३७ मैलांवर आहे; व पोर्टो नोव्हो हें दक्षिण अर्काट जिल्ह्यांत एक शहर व बंदर असून ते एक रेलवेस्टेशनही आहे. या शहरास " फिरंगी पेठ, " आणि " महंमद बंदर " अर्शी दोन नांवे आहेत. हे शहर व्हेलार नदीच्या मुखाशीं पडिचरीच्या दक्षिणेस ३२ मैलांवर असून तेथून सिलोन व अचीनकडे अतीशय व्यापारी दळणवळण चालू आहे; व बंदर या नात्याने या शहरास अतीशय महत्त्व प्राप्त झालेले आहे.